scorecardresearch

नंदिनीत कचरा फेकणाऱ्यांवर सीसी टीव्हीची नजर; नदीकाठी ६२ कॅमेरे कार्यान्वित होणार

शहरातून वाहणाऱ्या नंदिनी नदीला प्रदुषणाच्या जोखडातून सोडविण्यासाठी तिच्या काठावर उंटवाडीतील दोंदे पूल ते गोविंदनगपर्यंतच्या भागात ६२ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यास पालिका आयुक्त कैलास जाधव आणि स्मार्ट सिटी कंपनीने मान्यता दिली आहे.

नाशिक : शहरातून वाहणाऱ्या नंदिनी नदीला प्रदुषणाच्या जोखडातून सोडविण्यासाठी तिच्या काठावर उंटवाडीतील दोंदे पूल ते गोविंदनगपर्यंतच्या भागात ६२ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यास पालिका आयुक्त कैलास जाधव आणि स्मार्ट सिटी कंपनीने मान्यता दिली आहे. नदीपात्रात कचरा फेकणाऱ्यांवर या कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार आहे.

नंदिनी नदीच्या स्वच्छतेसाठी सीसी टीव्ही कॅमेरा बसविण्याची गरज शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने मांडली होती. यासाठी चाललेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. नंदिनी नदीत स्थानिकांकडून कचरा टाकला जातो. काही ठिकाणी वाळू उपसाही होतो. अतिक्रमणही होते. गोदावरीची उपनदी असणाऱ्या नंदिनीचे पावित्र्य आणि अस्तित्व जपण्यासाठी उंटवाडीतील दोंदे पूल ते गोविंदनगपर्यंत नदीच्या दोन्ही काठांवर सीसी टीव्ही बसवावेत, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्यां चारुशीला गायकवाड (देशमुख) यांनी महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीकडे केली होती. त्याची दखल घेत महापालिकेने सर्वेक्षण करून सीसी टीव्हीसाठी ६२ ठिकाणे निश्चित केली आहेत.  त्यास आयुक्त कैलास जाधव यांनी नुकतीच मंजुरी दिली. त्याबाबतचे पत्र आणि नकाशे स्मार्ट सिटीला पर्यावरण विभागाने दिले आहे. सीसी टीव्ही बसविण्याची कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल, असे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, याआधी फाऊंडेशनच्या पाठपुराव्यामुळे दोंदे पुलावर संरक्षक जाळी बसविली गेली आहे. जेणेकरून पात्रात थेट कचरा टाकण्यास काहीअंशी प्रतिबंध झाला. सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमुळे नदीला संरक्षक कवच प्राप्त होईल. कचरा फेकणाऱ्यांना चाप बसणार आहे.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cc tv nandinis garbage throwers 62 cameras activated river smart city amy

ताज्या बातम्या