धुळे – शहरातील श्री एकवीरा देवीच्या यात्रेत प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याच्या धर्तीवर विशेष सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेर्यांना संलग्न असलेल्या सर्व्हरवर १५० हून अधिक गुन्हेगारांची छायाचित्रे आणि आवश्यक ती माहिती साठविण्यात आली असल्याने यात्रेत येणार्या संशयीत गुन्हेगारांवर सीसीटीव्ही कॅमेर्यांची करडी नजर ठेवण्यात येत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.
धुळे शहरात खान्देश कुलस्वामीनी एकवीरा देवीच्या यात्रेनिमित्त पांझरा नदीच्या पात्रात मोठी जत्रा सजली आहे. दररोज हजारो भाविक यात्रेचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. त्यामुळे बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. यात्रेत होणाऱ्या चोऱ्यांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी यंदा यात्रेत एकवीरा देवीच्या मंदिर परिसरात तसेच यात्रेतील प्रमुख ठिकाणी सुमारे ५४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे ज्या सर्व्हरला जोडले आहे, त्यामध्ये धुळे जिल्ह्यातील १७ पोलीस ठाण्याच्या नोंदीतील संशयित प्रमुख १५० गुन्हेगारांची नावे, पत्ता, छायाचित्रासह इतर माहिती साठविण्यात आली आहे. त्यात रोज अधिकची माहिती जमा केली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
या सीसीटीव्ही कॅमेर्यांचे नियंत्रण कक्ष देवपूर पोलीस ठाण्यात तयार करण्यात आले आहे. तेथून यात्रेत ये-जा करणाऱ्यांवरर नजर ठेवली जात आहे. यात्रेत येणारी संशयीत व्यक्ती जर सीसीटीव्ही कॅमेर्यात दिसली तर त्वरीत पोलिसांच्या नियंत्रण कक्षात तसा संदेश प्राप्त होतो. तो संशयीत जेथे आहे ती जागा सुध्दा ठळकपणे दाखवण्यात येते. त्यामुळे पोलिसांना अधिकची कारवाई करणे शक्य होणार आहे.
देवपूर ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील यांच्यासह सहायक उपनिरीक्षक मिलींद सानवणे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविणाऱ्या कंपनीचे कर्मचारी यासर्व यंत्रणेवर देखरेख ठेवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात्रेपूर्वी यंत्रणेचे प्रात्यक्षिक पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना सर्व कॅमेरे आणि देखरेख यंत्रणेचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले होते.
कॅमेर्यांची उपयोगिता पाहिल्यावर धिवरे यांनी ही यंत्रणा बसविण्यासाठी सकारात्मकता दर्शवली. तसेच सर्व ठाण्यांना आदेश देत गुन्हेगारांची माहिती संकलित करून या यंत्रणेत टाकण्यात आली. संशयित वेशभूषा बदलून येऊ शकतात. त्यामुळे हे सीसीटीव्ही कॅमेरे साठविलेल्या गुन्हेगाराच्या छायाचित्राशी साम्य असलेले सुमारे २० ते २२ छायाचित्र एकाच वेळी स्कॅन करतात. त्यातून गुन्हेगाराच्या फोटोशी एक फोटो तंतोतंत जुळतो. त्यामुळे गुन्हेगाराला पकडणे सोपे होते. आमदार अनुप अग्रवाल यांनी या व्यवस्थेसाठी पाठपुरावा केला आहे.