नाशिक – पूर्व, मध्य आणि पश्चिम भारताला जोडण्यात महत्वाचा दूवा ठरणाऱ्या बहुप्रतिक्षित कसारा-मनमाड दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाच्या (रेल्वे लाईन) प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. १३१ किलोमीटर लांबीच्या या रेल्वे मार्गांसाठी तब्बल १० हजार १५४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. कसारा-इगतपुरी दरम्यान रेल्वेगाड्यांना मार्गस्थ करताना अतिरिक्त इंजिन जोडावे लागते. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याची गरज भासणार नाही. त्यामुळे मुंबई आणि उत्तर व पूर्व भारताला जोडणाऱ्या अधिक प्रवासी गाड्या सुरू करणे शक्य होणार आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी मिळालेल्या प्रकल्पात मनमाड ते कसारा दरम्यान तिसरी व चौथी रेल्वे मार्गिका टाकण्याचा समावेश असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. कसारा घाटातील हा आव्हानात्मक प्रकल्प आहे. कसारा-मनमाड हा १३१ किलोमीटर लांबीचा प्रकल्प ठाणे व नाशिक या दोन जिल्ह्यातून जातो.
पाच वर्षात तो पूर्णत्वास नेण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पात तीन महत्वाचे पूल, १६ मोठे पूल, २१८ लहान पूल, पाच रेल्वे उड्डाण पूल, २१ भुयारी मार्ग आणि पाच बोगद्यांचा समावेश आहे. यातील सर्वात मोठा बोगदा २४ किलोमीटरचा असेल. सध्या इगतपुरी-कसारा दरम्यान रेल्वेगाड्या मार्गस्थ करताना अधिकचे इंजिन जोडावे लागते. घाटात तीव्र चढण असल्याने त्याची गरज भासते. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर रेल्वेगाड्यांना अतिरिक्त अर्थात बॅकिंग इंजिनची आवश्यकता भासणार नाही.
अतिशय व्यस्त मुंबई-हावडा रेल्वे मार्गाचा हा भाग आहे. तो पूर्व, मध्य आणि पश्चिम भारताला जोडणारा महत्वाचा दुवा मानला जातो. कसारा-मनमाड मार्गाच्या विस्तारीकरणातून या मार्गावर अधिक प्रवासी गाड्या सुरू करणे दृष्टीपथास येणार आहे. या प्रकल्पामुळे साधारणत ८९ लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मिती होईल. तसेच दरवर्षी ५४ कोटी किलो कार्बन डायऑक्साईडची बचत होईल. आणि १२०७ कोटींच्या लॉजिस्टिक खर्चात बचत होणार आहे.
सद्यस्थिती काय ?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कसारा ते मनमाड दरम्यान सध्या दररोज १०० प्रवासी गाड्या आणि २५ मालगाड्या धावतात. नव्या रेल्वे मार्गामुळे त्यांची संख्या विस्तारता येणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सादरीकरणात नमूद केले होते. नाशिक जिल्हा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश फोकणे यांनी कसारा घाटातील अस्तित्वातील रेल्वे मार्ग ब्रिटीशांच्या काळात बांधला गेल्याकडे लक्ष वेधले. त्यानंतर या भागात पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्या नाहीत. संपूर्ण उत्तर भारताशी जोडणारा मध्य रेल्वेचा हा अतिशय व्यस्त मार्ग असून नवीन रेल्वे मार्गिकेमुळे प्रवासाचा कालावधी कमी होण्यास देखील मदत मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

