धुळे: जिल्ह्यातील नरडाणा रेल्वे स्थानकावर खास ‘एआय तंत्रज्ञानाधारित यंत्रणा’ कार्यान्वित करण्यासाठी एका स्वतंत्र अशा दुमजली इमारतीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बहुचर्चित आणि हाती घेण्यात आलेल्या मनमाड–इंदूर रेल्वे मार्गावरचे हे स्थानक भविष्यात अत्यंत महत्त्वाकांक्षी, आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासी-स्नेही केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून ही पायाभूत गुंतवणूक केली जात आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

रेल्वेच्या भुसावळ विभागात समावेश असलेले नरडाणा (ता. शिंदखेडा) हे स्थानक होऊ घातलेल्या मनमाड–इंदूर आणि बोरविहीर नरडाणा या दोन्ही रेल्वे मार्गासाठी भविष्यात अत्यंत महत्त्वाचे जंक्शन ठरणार असल्याचे मानले जाते. उत्तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश व विदर्भाशी थेट संपर्क साधणाऱ्या या मार्गामुळे आगामी काळात प्रवासी व मालवाहतुकीत मोठी वाढ होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. ही संभाव्य वाढ लक्षात घेऊनच येथील स्थानकावर ‘एआय तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा’ बसविण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे.

एआय तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा?

नरडाणा स्थानकावर सध्या बांधकाम सुरू असलेल्या दुमजली इमारतीत अत्याधुनिक कंट्रोल रूम, सर्व्हर रूम, डेटा प्रोसेसिंग युनिट, सीसीटीव्ही निरीक्षण कक्ष, स्मार्ट सिग्नल प्रणालीचे नियंत्रण केंद्र तसेच रेल्वे सुरक्षा दलासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार आहे. या इमारतीतून स्थानक परिसरातील संपूर्ण हालचालींवर कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीद्वारे नजर ठेवली जाणार आहे, परंतू या संभाव्य तांत्रिक बाबींची माहिती अधिकृतपणे जाहीर झालेली नाही. एआय प्रणालीच्या माध्यमातून प्रवाशांची गर्दी नियंत्रण, संशयास्पद हालचालींची तात्काळ ओळख, अपघात टाळण्यासाठी स्वयंचलित इशारे, प्लॅटफॉर्मवरील सुरक्षा व्यवस्थापन, तसेच गाड्यांच्या वेळापत्रकाचे अचूक नियोजन शक्य होऊ शकेल. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसह वेळेचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येऊ शकेल.

रेल्वे प्रशासनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुमजली इमारतीचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रसामग्री तैनात करण्यात आली आहे. मुख्य बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यानंतर लगेचच एआय प्रणालीची प्रतिष्ठापना व चाचणी प्रक्रिया हाती घेतली जाऊ शकेल.

नव्या रेल्वे मार्गासाठी सर्वार्थाने अनुकूल सोयी सुविधा

मनमाड–इंदूर रेल्वे मार्ग, बोरविहीर –नरडाणा उपमार्ग, तसेच औद्योगिक व कृषी मालवाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता नरडाणा स्थानकाचे हे आधुनिकीकरण भविष्यातील गरजांना पूरक ठरणार आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रेल्वे सेवा अधिक सक्षम, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल नरडाणा आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाला नवी गती देणारे ठरणार आहे.

याशिवाय, प्रस्तावित एआय तंत्रज्ञानाधारित यंत्रणेमुळे प्रवाशांना माहिती देण्याच्या पद्धतीतही आमूलाग्र बदल होणार आहेत. स्थानकावर स्मार्ट डिस्प्ले बोर्ड, स्वयंचलित उद्घोषणा प्रणाली, तसेच मोबाइल अ‍ॅपशी संलग्न माहिती सेवा कार्यान्वित केली जाऊ शकेल. याच आधुनिक तंत्रज्ञानामुळे गाडी उशीर, प्लॅटफॉर्म बदल, आगमन-प्रस्थान वेळा याबाबत प्रवाशांना तत्काळ व अचूक माहिती मिळू शकेल.शक्य झाल्यास याठिकाणी भविष्यात वृद्ध, दिव्यांग व महिला प्रवाशांसाठी विशेष सेन्सर-आधारित सहाय्य प्रणालीही राबविण्यात येऊ शकेल यामुळे नरडाणा रेल्वे स्थानक अधिक समावेशक आणि प्रवासी-अनुकूल ठरणार आहे.

दरम्यान, या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीलाही काहीशी चालना मिळणार आहे. एआय यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर देखभाल, डेटा व्यवस्थापन व सुरक्षा यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. भविष्यात नरडाणा स्थानकाला ‘स्मार्ट रेल्वे स्टेशन’ म्हणून ओळख मिळण्याची शक्यता असून, धुळे जिल्ह्यातील इतर स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठीही हा प्रकल्प दिशादर्शक ठरेल, असा विश्वास रेल्वे प्रशासनातील सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केला.