जळगाव : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मुंबई–नागपूर तसेच मुंबई–मडगाव मार्गावर एकूण चार विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः मुंबई–नागपूर दरम्यानच्या गाड्यांमुळे जळगावसह भुसावळच्या प्रवाशांना सणासुदीच्या आणि सुट्यांच्या काळात मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)–नागपूर दरम्यान दोन विशेष गाड्या धावणार असून गाडी क्रमांक ०२१३९ शनिवारी २५ जानेवारी रोजी मध्यरात्री ००.२० वाजता मुंबईहून सुटेल. आणि त्याच दिवशी दुपारी ०३.३० वाजता नागपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०२१४० नागपूरहून त्याच दिवशी रात्री १०.०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी ०१.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. या गाड्या दोन्ही बाजुने दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या प्रमुख स्थानकांवर थांबणार आहेत. एक वातानुकुलीत द्वितीय, सहा वातानुकुलीत तृतीय, नऊ शयनयान, चार सामान्य द्वितीय, एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन (एलएचबी कोचेस), अशी डब्यांची रचना असणार आहे.

याशिवाय लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)–मडगाव दरम्यान दोन विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०११२९ रविवारी २५ जानेवारी रोजी पहाटे ०१.०० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटून दुपारी १२.०० वाजता मडगाव येथे पोहोचेल. परतीसाठी गाडी क्रमांक ०११३० मडगावहून दुपारी ०२.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ०४.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. दोन्ही गाड्या ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबतील. एक वातानुकुलीत द्वितीय, तीन वातानुकुलीत तृतीय, आठ शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन (आयसीएफ कोचेस), अशी डब्यांची रचना असणार आहे.

चारही विशेष गाड्यांमध्ये वातानुकूलित, शयनयान तसेच सामान्य श्रेणीचे डबे उपलब्ध असणार आहेत. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–नागपूर दरम्यानच्या विशेष गाड्या एलएचबी कोचेससह तर लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगाव दरम्यानच्या विशेष गाड्या आयसीएफ कोचेससह धावतील. गाडी क्रमांक ०२१३९, ०२१४० आणि ०११२९ साठी आरक्षण २३ जानेवारी पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसी संकेतस्थळावर सुरू होणार आहे. अनारक्षित प्रवाशांसाठी युटीएस अ‍ॅपद्वारे तिकीट उपलब्ध असेल. गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी enquiry.indianrail.gov.in संकेतस्थळ किंवा एनटीईएस अ‍ॅपचा वापर करावा, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. ही माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.