जळगाव: होळी सणानिमित्त उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आणखी २४ साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस–कानपूर तसेच पुणे/हडपसर–झांसी या महत्त्वाच्या मार्गांवर या गाड्या धावणार आहेत. या सर्व गाड्यांना भुसावळला थांबा देण्यात आला आहे.

यापूर्वी मध्य रेल्वेने २१६ होळी विशेष गाड्यांची घोषणा केली होती. नव्याने जाहीर झालेल्या २४ फेऱ्यांमुळे होळी सणानिमित्त धावणाऱ्या एकूण विशेष गाड्यांची संख्या २४० वर पोहोचली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून प्रतीक्षा यादीचा ताण कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त गाड्यांची ही घोषणा प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार असून, मुंबई आणि उत्तर भारतातील प्रमुख शहरांदरम्यानच्या प्रवासाची मोठी सोय होणार आहे.

पुणे–झांसी साप्ताहिक सुपरफास्ट

०१९२१ पुणे–झांसी साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडीच्या पाच ते २६ मार्च दरम्यान आठ फेऱ्या होतील. ही गाडी दर गुरुवारी दुपारी ३.१५ वाजता पुण्यावरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०० वाजता विरांगना लक्ष्मीबाई झांसी येथे पोहोचेल. तर ०१९२२ झांसी–पुणे ही गाडी चार ते २५ मार्च दरम्यान दर बुधवारी दुपारी १२.५० वाजता झांसी स्थानकाहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३५ वाजता पुण्यात पोहोचेल. दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, नर्मदापुरम, राणी कमलापती, विदिशा, बिना आणि ललितपूर येथे थांबे असतील.

हडपसर–झांसी साप्ताहिक सुपरफास्ट

०१९२३ हडपसर–झांसी विशेष साप्ताहिक गाडी आठ ते २९ मार्च दरम्यान दर रविवारी सायंकाळी ०७.१० वाजता हडपसरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ०३.०० वाजता झांसी येथे पोहोचेल. ०१९२४ झासी–हडपसर ही विशेष गाडी सात ते २८ मार्च दरम्यान दर शनिवारी सायंकाळी ७.४० वाजता झांसी स्थानकाहून सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.३० वाजता हडपसर येथे पोहोचेल. या गाड्यांना दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, राणी कमलापती आणि बिना येथे थांबे असतील.

लोकमान्य टिळक टर्मिनस–कानपूर

०४१५२ लोकमान्य टिळक टर्मिनस–कानपूर ही विशेष गाडी सात ते २८ मार्च २०२६ दरम्यान दर शनिवारी दुपारी ०५.१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटेल. आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ०३.४५ वाजता कानपूर सेंट्रल येथे पोहोचेल. परतीच्या दिशेने ०४१५१ ही गाडी सहा ते २७ मार्च दरम्यान दर शुक्रवारी दुपारी ०१.०० वाजता कानपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी ०२.५५ वाजता मुंबईत येईल. या गाड्यांना भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, धाभौरा, प्रयागराज, भारवारी, सिरथू आणि फतेहपूर या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. गाडीत वातानुकूलित तृतीय श्रेणी, शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.

रेल्वे गाड्यांच्या आरक्षणाची माहिती

गाडी क्रमांक ०४१५२, ०१९२१ आणि ०१९२३ साठी आरक्षण २३ फेब्रुवारीपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होणार आहे. अनारक्षित डब्यांसाठी तिकिटे यूटीएस प्रणालीद्वारे उपलब्ध राहतील. प्रवासी रेलवन ॲपद्वारेही तिकिटे आरक्षित करू शकतात. सविस्तर वेळापत्रकासाठी भारतीय रेल्वेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. किंवा एनटीईएस ॲपचा वापर करावा, असे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल निला यांनी केले आहे.