जळगाव: प्रवाशांची वाढती संख्या आणि गैरसोय लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने भुसावळ–नागपूर दरम्यान अनारक्षित विशेष मेमू रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विदर्भ आणि खान्देश या दोन प्रमुख विभागांना जोडणाऱ्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, गाडी क्रमांक ०११०१ ही अनारक्षित विशेष मेमू गाडी शनिवारी (ता. ७) आणि रविवारी (ता. ८) भुसावळ स्थानकावरून सकाळी ७.५० वाजता सुटेल. ही गाडी मार्गावरील सर्व निर्धारित स्थानकांवर थांबत दुपारी ०२.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे परतीच्या प्रवासासाठी ०११०२ ही विशेष मेमू गाडी त्याच दिवशी नागपूर स्थानकावरून दुपारी ०३.३० वाजता सुटून रात्री ०९.५० वाजता भुसावळ येथे दाखल होईल. या विशेष रेल्वे गाडीला बोदवड, मलकापूर, नांदुरा, जलंब, शेगाव, अकोला, बोरगाव, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, वर्धा आणि अजनी या एकूण १३ स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
संबंधित सर्व थांब्यांमुळे ग्रामीण व निमशहरी भागातील प्रवाशांना थेट नागपूर व भुसावळकडे जाण्यासाठी सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. विशेषतः अकोला, शेगाव, मूर्तिजापूर आणि बडनेरा या प्रमुख जंक्शन स्थानकांवरील प्रवासी या सेवेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही विशेष गाडी १२ डब्यांची मेमू संरचना असलेली असून, ती पूर्णतः अनारक्षित असल्यामुळे आरक्षणाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या या मार्गावरील अनेक प्रवासी गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागत होता. त्यावर उपाय म्हणून ही विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच आठवड्याच्या शेवटी तसेच सण-उत्सवाच्या कालावधीत प्रवाशांची संख्या अधिक असल्याने ही गाडी विशेष उपयुक्त ठरणार आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासापूर्वी गाडीचे अचूक वेळापत्रक, थांबे तसेच गाडीची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा एनटीईएस मोबाईल ॲप डाउनलोड करून माहिती घ्यावी. भविष्यात प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन अशा विशेष अनारक्षित गाड्यांची संख्या वाढवण्याची शक्यता असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या निर्णयामुळे भुसावळ–नागपूर मार्गावरील प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेळेवर होण्यास मदत होणार असून, रेल्वे प्रशासनाच्या या उपक्रमाचे प्रवाशांकडून स्वागत होत आहे.

