जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात नवीन मार्गिकांची उभारणी तसेच विद्युतीकरण, सिग्नलिंग-कवच प्रणाली आणि स्थानकांच्या पुनर्विकासाला अलीकडे मोठ्या प्रमाणात गती देण्यात आली आहे. विशेषतः नवीन मार्गिकांच्या उभारणीसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आल्याने भविष्यात विभागातील प्रवासी आणि मालवाहतूक सेवा अधिक सक्षम आणि वेगवान होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत भुसावळ विभागातील इंदूर–मनमाड नवीन ब्रॉडगेज मार्ग हा सर्वात मोठा प्रकल्प असून, सुमारे ३०९.४३ किमी लांबीच्या या मार्गासाठी १६,३२०.५४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गावर एकूण ३४ स्थानके प्रस्तावित आहेत. त्याचबरोबर भुसावळ–वर्धा तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला सप्टेंबर २०२४ मध्ये मंजुरी मिळाली असून, ३१३ किमी लांबीच्या या प्रकल्पासाठी ९,१९६.९८ कोटी रुपये खर्च होणार आहे. या मार्गावरही एकूण ३६ स्थानके असतील. धुळे–नरडाणा नवीन मार्गासाठी (५०.६० किमी) ४९२.७६ कोटी रुपये खर्च होणार असून, एकूण सहा स्थानके असतील. जळगाव–जालना (अजिंठा लेणी) ब्रॉडगेज (१७४ किमी) मार्गासाठी ५,८०४.३७ कोटी रुपये खर्च होणार असून, एकूण १९ स्थानके असतील. जळगाव–भादली अतिरिक्त मार्गिकेसाठी (८.६६ किमी) देखील ११५.९९ कोटींची तरतूद आहे. या सर्व प्रकल्पांमुळे भविष्यात भुसावळ विभागातील कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुधारण्याची अपेक्षा आहे.
मेमू सेवांच्या आधुनिकीकरणावर भर
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मेमू सेवांच्या आधुनिकीकरणावरही विशेष भर देण्यात आला आहे. २५ मेमू रॅकसाठी शेड विकासाचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, तो ‘मिशन रफ्तार’ उपक्रमाला पूरक ठरणार आहे. सध्या भुसावळ विभागात ८ आणि १२ डब्यांच्या रचनेचे एकूण २० मेमू रॅक कार्यरत असून, प्रवाशांना अधिक जलद आणि सोयीस्कर सेवा देण्यावर भर आहे. विभागात अपघातांचे प्रमाण कमी करण्याकरिता ‘कवच’ तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. भुसावळ येथे एकीकृत कवच नियंत्रण केंद्र ४ सप्टेंबर २०२५ रोजी कार्यान्वित झाले आहे. या केंद्रामध्ये फॅक्टरी ॲक्सेप्टन्स टेस्ट (फॅट) सुविधा तसेच नेटवर्क मॉनिटरिंग सिस्टमचा (एनएमएस) समावेश असल्याने रिअल-टाइम देखरेखीची सोय उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत तीन स्थानकांवर कवच प्रणाली बसवून तिची यशस्वी चाचणी पूर्ण झाली आहे. आवश्यक कवच टॉवर्स उभारण्यात आले आहेत. तसेच आरएफआयडी टॅग्ज बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.
आधुनिक सिग्नलिंग प्रणालीचा वापर
वाहतूक सुलभता वाढवण्यासाठी आणि गाड्यांची वेळपालन क्षमता सुधारण्यासाठी आधुनिक सिग्नलिंग प्रणालीचा वापर वाढवला जात आहे. नांदगाव–पिंपरखेड तिसरी मार्गिका कार्यान्वित करण्यात आली असून, नांदगाव यार्डाचे पुनर्रचना काम ऑक्टोबर २०२५ मध्ये पूर्ण झाले आहे. जळंब स्थानकाचे एचआयमॅक्स तंत्रज्ञानासह आधुनिकीकरण करण्यात आले आहे. आणि जानेवारी २०२६ मध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली लागू करण्यात आली आहे. माहेजी स्थानक जून २०२५ मध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसह कार्यान्वित झाले आहे. याशिवाय बडनेरा–कुरुम–माना आणि शेगाव–पारस या मार्गांवर एकूण ४६.५ किमी अंतरावर स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
स्थानकांच्या पुनर्विकासाला वेग
विद्युतीकरणाच्या क्षेत्रातही मोठे बदल सुरू असून १x२५ केव्ही प्रणालीवरून २x२५ केव्ही ट्रॅक्शन प्रणाली अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. इगतपुरी–पाचोरा, पाचोरा–भुसावळ आणि भुसावळ–खंडवा या महत्त्वाच्या विभागांमध्ये हे काम प्रगतीपथावर आहे. यामुळे रेल्वे गाड्यांची कार्यक्षमता आणि ऊर्जा वापर अधिक परिणामकारक होणार आहे. स्थानकांच्या विकासासाठी अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत भुसावळ विभागात मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. मे २०२५ मध्ये पाच स्थानकांचे उद्घाटन करण्यात आले असून, २०२५-२६ आर्थिक वर्षात चार स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे. तर आणखी सात स्थानकांचा पुढील आर्थिक वर्षात विकास होणार आहे. भुसावळसह नाशिकरोड आणि इतर प्रमुख स्थानके पुनर्विकासासाठी निश्चित करण्यात आली आहेत.
