जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ–बडनेरा विभागाअंतर्गत येणाऱ्या जलंब रेल्वे स्थानकावर डाउन लूप लाईनच्या विस्तारासह इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी यार्ड रिमॉडेलिंग आणि नॉन इंटरलॉकिंगचे काम केले जाणार आहे. यासाठी काही प्रवासी गाड्यांच्या वेळेत तात्पुरते बदल, नियमन तसेच काही गाड्या थेट रद्द करण्यात येणार आहेत.

जलंब रेल्वे स्थानकावर डाउन लूप लाईनच्या विस्तारासह इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी यार्ड रिमॉडेलिंग आणि नॉन इंटरलॉकिंगचे काम ३० जानेवारीला केले जाणार आहे. यासाठी गाडी क्रमांक २०८२४ अजमेर–पुरी एक्सप्रेसचे विभागात २.३० तास नियमन करण्यात येणार आहे. गाडी क्रमांक २२७१० अम्ब अन्दौरा–हजूर साहिब नांदेड एक्सप्रेसचे विभागात दोन तास नियमन करण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ११०४० गोंदिया–कोल्हापूर एक्सप्रेसचे दोन तास आणि गाडी क्रमांक १२७५१ हजूर साहिब नांदेड–जम्मू तवी एक्सप्रेसचे विभागात एक तास ३० मिनिटे नियमन करण्यात येणार आहे.

या रेल्वे गाड्या असतील रद्द

३० जानेवारीला गाडी क्रमांक ६११०१ भुसावळ–बडनेरा मेमू, गाडी क्रमांक ६११०२ बडनेरा–भुसावळ मेमू, गाडी क्रमांक १११२१ भुसावळ–वर्धा एक्सप्रेस, गाडी क्रमांक १११२२ वर्धा–भुसावळ एक्सप्रेस, गाडी क्रमांक ०१२११ बडनेरा–नाशिक रोड विशेष मेमू रद्द करण्यात आली आहे. याशिवाय, गाडी क्रमांक ०१२१२ नाशिक रोड–बडनेरा विशेष मेमू २९ तारखेला रद्द करण्यात आली आहे. रद्द झालेल्या गाड्यांची याची नोंद रेल्वे प्रवाशांनी घेऊन प्रवासाचे नियोजन करावे. जलंब रेल्वे स्थानकावरील ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत, असे मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडल कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

एलटीटी–कानपूरच्या कालावधीत वाढ

गाडी क्रमांक ०४१५२ लोकमान्य टिळक टर्मिनस–कानपूर साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर शनिवारी दुपारी ०५.१५ वाजता सुटते. आणि कानपूर येथे दुसऱ्या दिवशी ०३. ४५ वाजता पोहोचते. या गाडीचा कालावधी आता वाढविण्यात आला आहे. त्यामुळे ही गाडी यापुढील काळात ३१ जानेवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान चालविण्यात येणार असून, तिच्या एकूण पाच फेऱ्या होतील. गाडी क्रमांक ०४१५१ कानपूर–लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी कानपूर येथून दर शुक्रवारी ०१.०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी ०२.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचते. या गाडीचा कालावधी वाढविण्यात आला असून, आता ती ३० जानेवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान चालविण्यात येणार आहे. तिच्या एकूण पाच फेऱ्या होतील. इगतपुरी, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, धभौरा, प्रयागराज, भरवारी, सिराथू आणि फतेहपूर या स्थानकांवर दोन्ही बाजुला थांबे देण्यात आले आहे.