धुळे : बहुचर्चित आणि प्रत्यक्ष कृतीत उतरलेल्या मनमाड–इंदूर प्रस्तावित नवीन रेल्वेमार्गांतर्गत आणखी ११८ हेक्टर जमीन भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्याची तयारी प्रशासकीय पातळीवर पूर्ण करण्यात येत आहे. बाधित जमीन मालकांना प्रचलित नियम व अटींनुसार मोबदला देण्यात यावा, यासाठीही प्रशासनाने प्राथमिक तयारी पूर्ण केली आहे.

मनमाड–इंदूर प्रस्तावित नवीन रेल्वेमार्गांतर्गत पुरमेपाडा ते बाळापूर या टप्प्यातील भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पुढे सरकली असून, या संदर्भातील प्राथमिक आकडेवारी स्पष्ट झाली आहे. या रेल्वेमार्गासाठी एकूण नऊ गावांतील शेतजमीन संपादित होणार असून, सुमारे ७८७ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र या प्रकल्पाच्या कक्षेत येत आहे. त्यापैकी सुमारे ११८ हेक्टर क्षेत्र संभाव्य संपादनासाठी निश्चित करण्यात आले आहे.

मनमाड–इंदूर रेल्वेमार्ग हा उत्तर महाराष्ट्र व मध्य प्रदेशाला थेट जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात असून, या मार्गामुळे मालवाहतूक आणि प्रवासी दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर भूसंपादनाची प्रक्रिया ही प्रकल्पातील महत्त्वाची पायरी मानली जात आहे.

नऊ गावांमध्ये भूसंपादन

उपलब्ध माहितीनुसार, पुरमेपाडा गावात एकूण ९९.४२५० हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी १६.०५२६ हेक्टर क्षेत्र संपादनासाठी प्रस्तावित आहे. आर्वी गावात १४४.१६९२ हेक्टर एकूण क्षेत्र असून, २३.७९६४ हेक्टर क्षेत्र संभाव्य संपादनात येते. लळींग गावात १४३.९४४७ हेक्टर क्षेत्रापैकी १०.१४१७ हेक्टर क्षेत्र संपादनासाठी निश्चित करण्यात आले आहे. रानमळा गावात एकूण १३३.५००० हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी १३.३६४३ हेक्टर क्षेत्र संपादनाच्या प्रक्रियेत येणार आहे. अवधान गावात ४७.८००० हेक्टर एकूण क्षेत्र असून, १०.०४७९ हेक्टर क्षेत्र संभाव्य संपादनासाठी प्रस्तावित आहे. सावळदे गावातील ४०.५९०७ हेक्टर क्षेत्रापैकी ७.७३८१ हेक्टर क्षेत्र रेल्वेमार्गासाठी घेतले जाणार आहे. वडजाई गावात एकूण १७.२१०० हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी ३.०९११ हेक्टर क्षेत्र संपादनात समाविष्ट आहे. पिंपरी गावात १२५.५१९५ हेक्टर क्षेत्र असून, १०.७६३४ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित संपादन क्षेत्रात येते. बाळापूर गावात एकूण ३५.८३४० हेक्टर क्षेत्र असून, त्यातील २३.६३७२ हेक्टर क्षेत्र संपादनासाठी निश्चित करण्यात आले आहे.

या सर्व गावांचा एकत्रित विचार करता, एकूण ७१०.२१२६ हेक्टर लागवडीयोग्य क्षेत्र आणि ७७.७८०५ हेक्टर पोटखराब क्षेत्र असे मिळून ७८७.९९३१ हेक्टर एकूण क्षेत्र या टप्प्यात येत आहे. यापैकी ११८.६३२७ हेक्टर क्षेत्र संभाव्य भूसंपादनासाठी प्रस्तावित आहे. दरम्यान, भूसंपादन प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, तसेच कायदेशीर तरतुदीनुसार पारदर्शक पद्धतीने कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा स्थानिक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

प्रशासनाकडून मोजणी, हरकती नोंदविणे आणि भरपाई निर्धारणाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविली जाऊ शकते. मनमाड–इंदूर रेल्वेमार्ग प्रत्यक्षात आल्यास धुळे जिल्ह्यासह परिसरातील औद्योगिक, व्यापारी व कृषी क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मोबदला देण्याची प्रशासनाने तयारी ठेवली असून, तशी चर्चाही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झाली आहे. ज्यांची जमीन या प्रकल्पांतर्गत येणार आहे, त्या जमीन मालकांची या प्रकल्पाच्या निर्मितीत मोठी ऐतिहासिक भूमिका असेल, हे निश्चित आहे. – रोहन कुंवर, प्रांताधिकारी (धुळे)