जळगाव : देशातील विविध भागांतून शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या तसेच राजस्थानकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने साईनगर शिर्डी–बिकानेर साप्ताहिक विशेष रेल्वे सेवेच्या संचालन कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि राजस्थान, या तीन राज्यांतील प्रवाशांना थेट, सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

शिर्डी हे देशातील एक प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्र असून, दरवर्षी लाखो भाविक येथे साई दर्शनासाठी येतात. तसेच बिकानेर आणि राजस्थानमधील इतर शहरांकडे व्यापार, शिक्षण, पर्यटन आणि कौटुंबिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या पार्श्वभूमीवर, साईनगर शिर्डी–बिकानेर विशेष रेल्वे सेवेची मुदत वाढविण्याचा निर्णय प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत स्वागतार्ह मानला जात आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडल कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०४७१६ साईनगर शिर्डी–बिकानेर साप्ताहिक विशेष रेल्वे ही यापूर्वी केवळ एक फेब्रुवारीपर्यंत चालविण्यात येणार होती. आता प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता ही रेल्वे सेवा एक मार्च २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे, परतीच्या प्रवासासाठी असलेली गाडी क्रमांक ०४७१५ बिकानेर–साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष रेल्वे ही पूर्वी ३१ जानेवारीपर्यंत अधिसूचित होती. मात्र, आता या गाडीचे संचालन २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. साईनगर शिर्डी–बिकानेर विशेष रेल्वे गाडी अनेक महत्त्वाच्या स्थानकांवरून धावणार असून, त्यामुळे मार्गावरील लहान-मोठ्या शहरांतील प्रवाशांना थेट जोडणी मिळणार आहे. या गाड्यांना दोन्ही बाजुने मनमाडसह भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, नागदा, शामगढ, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा, जयपूर, ढेहर का बालाजी, रिंगस, सीकर, लक्ष्मणगढ, फतेहपूर शेखावाटी, चुरू, रतनगढ, राजलदेसर आणि श्री डूंगरगढ, अशा प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

प्रवाशांसाठी ही रेल्वे सेवा त्यामुळे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. विशेष म्हणजे, मुदतवाढ देताना या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात, थांब्यांमध्ये तसेच डब्यांच्या संरचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे आधीच आरक्षण केलेले प्रवासी, तसेच भविष्यातील प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांना कोणताही संभ्रम राहणार नाही. नियमित वेळापत्रकानुसारच या गाड्या धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी गाड्यांची सध्याची स्थिती, आगमन-प्रस्थान वेळा तसेच इतर माहिती मिळविण्यासाठी http://www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी किंवा नॅशनल ट्रेन एन्क्वायरी सिस्टीम अ‍ॅपचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.