मनमाड – चार दिवसांत मध्य रेल्वेद्वारे नियमित गाड्यांव्यतिरिक्त ८६२ होळी विशेष गाड्या चालवल्या गेल्या. या गाड्यांमध्ये पूर्णपणे वातानुकूलित विशेष गाड्या, अनारक्षित विशेष गाड्या आणि देशभरातील विविध लोकप्रिय ठिकाणांसाठी वातानुकूलित, शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असलेल्या इतर गाड्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यांतर्गत प्रवासासाठी ४०९ गाड्या तर गोव्यासाठी २१ गाड्या चालवल्या. होळीपूर्वी चार दिवसांत (२७ फेब्रुवारी ते ०२ मार्च पर्यंत) मध्य रेल्वेच्या नियमित आणि विशेष गाड्यांमधून (होळीच्या विशेष गाड्यांसह) २४.१८ लाख प्रवाशांनी प्रवास केला. यामध्ये मुंबईहून सात लाख प्रवाशांचा समावेश आहे

देशभरातील प्रमुख ठिकाणांना जोडण्यासाठी या विशेष गाड्यांचे काटेकोरपणे नियोजन केले. अतिरिक्त गाड्यांचे नियोजन आणि व्यवस्थापन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. ज्यासाठी माध्यमांमधील बातम्या, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, रेल्वे इंटिग्रेटेड हेल्पलाइन नंबर १३९ यासारख्या सर्व माध्यमांकडून २४ तास माहिती घेतली जाते, तसेच पीआरएस सिस्टममधील प्रतीक्षा यादीतील प्रवाशांची माहिती देखील घेतली जाते. जेणेकरून विशिष्ट मार्गावरील गाड्यांची मागणी तपासता येईल. या आवश्यकतेनुसार, गाड्यांची संख्या आणि फेऱ्यांची संख्या वाढवली जाते.

होळी उत्सवाच्या काळात प्रवाशांच्या वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने व्यापक व्यवस्था केली. त्यात प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), पुणे इत्यादी प्रमुख स्थानकांवर होल्डिंग एरियाची व्यवस्था. कव्हर्ड शेड, पुरेसा प्रकाश, व्हेंटिलेशन, पिण्याचे पाणी, पंखे, शौचालये, चार्जिंग पॉइंट्स, फूड स्टॉल्स आणि प्रवाशांना मार्गदर्शन व्यवस्था करण्यात आली. प्रमुख स्थानकांवर तिकीट तपासणी कर्मचारी आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या पथकासह प्रभावी गर्दी व्यवस्थापन. स्थानकांवर मदत कक्षांची व्यवस्था. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मोबाईल यूटीएस सहाय्यकांची व्यवस्था. गाड्यांच्या वेळा आणि इतर महत्वाच्या माहितीबाबत नियमित घोषणा करण्यात आल्या.

आरपीएफ कर्मचारी आणि वाणिज्यिक कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली प्रवाशांना चढण्यासाठी रांगेत उभे राहण्याची खात्री करण्यात आली. एआय आणि वॉर रूमच्या मदतीने तिकिटांची उपलब्धता आणि प्रवाशांच्या ट्रेंडचे रिअल-टाइम निरीक्षण. प्रमुख स्थानकांवर सुरक्षिततेसाठी आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांशी समन्वय. कार्यक्षम व्यवस्था, सुधारित प्रवासी सेवा आणि सुविधा आणि काळजीची वचनबद्धता यासह, उत्सवाच्या काळात प्रत्येक प्रवाशाला त्याच्या रेल्वे प्रवासादरम्यान चांगली सेवा मिळावी यासाठी परिश्रम घेत असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने यानिमित्ताने केला आहे.