नाशिक – रेल्वेची सुरक्षा व्यवस्था कायमच चर्चेत असते. मध्य रेल्वेने नुकतीच १३३.८९ किमी लांबीच्या येवला -अहिल्यानगर विभागात कवच ४.०, सेफ्टी इंटिग्रिटी लेव्हल-४ (एसआयएल – ४) ची स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकन (आयएसए) तपासणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. यासाठी इटलीचे सहकार्यही महत्वाचे आहे. हा रेल्वे सुरक्षा व्यवस्थेतील एक महत्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
‘कवच ४.०’ ही स्वदेशी विकसित ‘ट्रेन कोलिजन अव्हॉइडन्स सिस्टिम’ (टीसीएएस) आहे. रेल्वेच्या सुरक्षिततेत वाढ करण्याच्या उद्देशाने विकसित केलेली ही प्रणाली, सिग्नल ओलांडून पुढे जाण्याच्या (एसपीएडी) घटना रोखणे, अतिवेगावर नियंत्रण करणे आणि आवश्यकतेनुसार आपोआप ब्रेक लावणे यांसारखी कार्ये करते. रेल्वे अपघातांचा धोका लक्षणीयरीत्या कमी करणे आणि रेल्वे कामकाजाची सुरक्षितता व विश्वासार्हता वाढवणे, हे या प्रणालीचे मुख्य उद्दिष्ट आहे.
१३३ किमी लांबीच्या अहिल्यानगर – येवला विभागात १२ रेल्वे स्थानके असून, ती १२ स्टेशन टीसीएएस युनिट्स, ४ लेव्हल क्रॉसिंग टीसीएएस युनिट्स, १ रिमोट इंटरफेस युनिट (आरआययू), २० रेडिओ टॉवर्स आणि १,७७४ रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआईडी) टॅग्जने सुसज्ज आहेत. स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकन (आयएसए) इटली येथील टीमद्वारे करण्यात आले आहे. यामध्ये ओव्हरस्पीड संरक्षण, कायमस्वरूपी वेगमर्यादा (पीएसआर) देखरेख, लेव्हल क्रॉसिंगवर स्वयंचलित शिट्टी वाजवणे, टर्नआउट वेग देखरेख आणि सिग्नल पासिंग ॲट डेंजर (एसपीएडी) प्रतिबंध यांसारख्या महत्त्वपूर्ण सुरक्षा वैशिष्ट्यांची सर्वसमावेशक चाचणी आणि पडताळणी समाविष्ट होती.
या तपासणीमध्ये ऑनबोर्ड कवच प्रणाली आणि स्टेशन मास्टर ऑपरेशन कम इंडिकेशन पॅनल (एसएमओसीआयपी) मधून एसओएस अलर्ट निर्माण करणे, रोलबॅक, रोल-अवे आणि रिव्हर्स हालचालींना प्रतिबंध करणे, गहाळ आरएफआईडी टॅग्ज ओळखणे आणि टॅग्जमधील अंतर मोजणे यांचाही समावेश होता. पुढील मूल्यांकनांमध्ये हालचाल अधिकार आणि सिग्नल पैलूंची पडताळणी, ऑनबोर्ड-टू-ट्रॅकसाइड कम्युनिकेशन, रेडिओ कनेक्टिव्हिटी, आरएफआयडी टॅग ओळख आणि स्थानाची अचूकता, ब्रेकिंग हस्तक्षेप, वेग निरीक्षण, प्रणालीतील दोष हाताळणी आणि फेल-सेफ प्रतिसाद यांचा समावेश होता.
