जळगाव : भुसावळ विभागातील रेल्वे वाहतुकीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेने निवडक मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात व्यापक बदल जाहीर केले आहेत. १४ एप्रिल पासून टप्प्याटप्प्याने लागू होणाऱ्या या बदलांमुळे अनेक महत्त्वाच्या गाड्यांच्या आगमन व प्रस्थान वेळांमध्ये फेरबदल करण्यात आल्याने भुसावळसह जळगाव, बडनेरा, अकोला, मूर्तिजापूर यांसारख्या प्रमुख स्थानकांवरील सध्याच्या वेळापत्रकावर त्याचा थेट परिणाम होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अमरावती दरम्यान धावणारी १२१११ क्रमांकाची एक्स्प्रेस उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या गाडीच्या वेळापत्रकात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले असून, नाशिकरोड येथे आता तिचे पहाटे ००.१५ वाजता आगमन असेल. पुढे जळगाव येथे ०३.१३, भुसावळ येथे ०३.४०, मलकापूर येथे ०४.३८, नांदुरा येथे ०४.५८, शेगाव येथे ०५.१८, अकोला येथे ०६.१०, मूर्तिजापूर येथे ०६.४८, बडनेरा येथे ०७.५७ आणि अखेरीस अमरावती येथे ०८.३५ वाजता आगमन, असे नवीन वेळापत्रक १४ एप्रिलपासून लागू होणार आहे. नवीन वेळापत्रकानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–अमरावती एक्स्प्रेसचे जळगाव स्थानकावर साधारणपणे ३३ मिनिटे तर भुसावळ स्थानकावर २० मिनिटे उशिरा यापुढील काळात आगमन होईल.
१२२८९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–नागपूर दुरांतो एक्स्प्रेस
या गाडीच्या प्रस्थान वेळेतही लक्षणीय बदल करण्यात आला असून, ती आता रात्री ०८.३५ वाजता सुटेल, जी सध्या रात्री ०७.५५ वाजता सुटते. या गाडीचे भुसावळ येथे पहाटे ०२.४५ आणि बडनेरा येथे ०५.४८ असे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे १२२९० नागपूर–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दुरांतो एक्स्प्रेसचे बडनेरा येथे रात्री १०.१० आणि भुसावळ येथे पहाटे ००.५० या वेळेत आगमन होईल.
१२८०९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–हावडा मेल
या गाडीच्या मूर्तिजापूर (सकाळी ०६.५८) आणि बडनेरा (०८.१०) स्थानकांवरील वेळांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. तसेच १२८४४ अहमदाबाद–पुरी, २२९७३ गांधीधाम–पुरी आणि २०८६२ अहमदाबाद–पुरी या तिन्ही गाड्यांचे बडनेरा स्थानकावरील वेळापत्रक एकसारखे करण्यात आले आहे. या सर्व गाड्यांचे बडनेरा येथे सकाळी ०८.०२ वाजता आगमन होईल. या बदलांच्या अंमलबजावणीच्या तारखा अनुक्रमे १६, १५ आणि १७ एप्रिल अशा आहेत.
१२१०५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस
या गाडीचे बडनेरा येथे सकाळी ०५.५८ आगमन, असे नवीन वेळापत्रक १४ एप्रिलपासून लागू होईल. तसेच १९०२२ ब्रम्हपूर–उधना अमृत भारत एक्स्प्रेस ही गाडी १६ एप्रिलपासून बडनेरा येथे रात्री १०.२० वाजता पोहचेल. अजनी–पुणे मार्गावरील साप्ताहिक एक्स्प्रेस (२२१४०) आणि वातानुकूलित साप्ताहिक एक्सप्रेस (२२१२४) या दोन्ही गाड्यांचे बडनेरा येथे रात्री १०.३३ असे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, अनुक्रमे १९ एप्रिल आणि १४ एप्रिलपासून हे बदल लागू होतील.
या सर्व बदलांचा उद्देश गाड्यांची वेळपालन क्षमता वाढवणे, प्रवास अधिक सुकर करणे आणि मार्गावरील गर्दीचे व्यवस्थापन सुधारणे हा असल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवाशांनी सुधारित वेळापत्रकाची माहिती आधीच घेऊन तिकीट आरक्षण व प्रवास नियोजन करावे, असेही आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. तसेच संबंधित स्थानकांवरील डिजिटल फलक, चौकशी केंद्रे आणि अधिकृत संकेतस्थळांवर अद्ययावत वेळांची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
