जळगाव : मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता फेब्रुवारी महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) आणि पुणे येथून नागपूरसाठी विशेष सुपरफास्ट गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सण-समारंभ, लग्नसराई तसेच व्यावसायिक व शैक्षणिक प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
सीएसएमटी–नागपूर–सीएसएमटी सुपरफास्ट विशेष
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते नागपूर दरम्यान दोन विशेष सेवा चालवण्यात येणार आहेत. २१३९ सुपरफास्ट विशेष गाडी १९ फेब्रुवारी रोजी पहाटे ००.२० वाजता सीएसएमटीहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता नागपूरला पोहोचेल.
तर ०२१४० सुपरफास्ट विशेष गाडी १७ फेब्रुवारी रोजी रात्री ८.०० वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता सीएसएमटीला पोहोचेल. या गाड्यांना दोन्ही बाजुने दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा, या प्रमुख स्थानकांवर थांबे असतील. गाड्यांची रचना प्रवाशांच्या गरजेनुसार एसी, स्लीपर आणि जनरल डब्यांसह करण्यात आली आहे.
एलटीटी–नागपूर–एलटीटी विशेष गाड्या
लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर दरम्यान चार विशेष सेवा देण्यात येणार आहेत. ०१०२१ सुपरफास्ट विशेष गाडी १४ आणि २१ फेब्रुवारी रोजी पहाटे ००.५५ वाजता एलटीटीहून सुटून त्याच दिवशी दुपारी ३.४५ वाजता नागपूरला पोहोचेल. तर ०१०२२ विशेष गाडी १४ आणि २१ फेब्रुवारी रोजी रात्री ८.०० वाजता नागपूरहून सुटेल. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता एलटीटीला पोहोचेल. या गाड्यांना दोन्ही बाजुने ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे असतील. इगतपुरी येथे थांबा फक्त नागपूर–एलटीटी मार्गावरील ०१०२२ गाडीसाठी असणार आहे.
पुणे–नागपूर–पुणे सुपरफास्ट स्पेशल
पुणे आणि नागपूर दरम्यानही विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे. ०१४६७ सुपरफास्ट विशेष गाडी १३ आणि २० फेब्रुवारी रोजी दुपारी ३.५० वाजता पुण्याहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल. ०१४६८ सुपरफास्ट विशेष गाडी १४ आणि २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.०० वाजता नागपूरहून सुटेल. आणि त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पुण्यात पोहोचेल. याशिवाय ०१४१९/०१४२० या दोन अतिरिक्त विशेष गाड्या पुणे आणि नागपूर दरम्यान १८ आणि १९ फेब्रुवारी २०२६ रोजी धावणार आहेत. या सर्व गाड्यांना उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे असतील.
आरक्षण आणि प्रवासी सुविधा
सर्व विशेष गाड्यांसाठी आरक्षण सर्व पीआरएस आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर खुले करण्यात आले आहे. अनारक्षित प्रवाशांसाठी तिकीट यूटीएस प्रणालीद्वारे काढता येणार असून, प्रवासी रेलवन मोबाईल अॅपचा वापर करूनही तिकीट बुक करू शकतात. विशेष गाड्यांच्या थांब्यांचे सविस्तर वेळापत्रक आणि अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. या विशेष सेवांमुळे मुंबई, पुणे आणि नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुकर होणार आहे.
