जळगाव : नव्वदच्या दशकातील ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट अनेकांनी पाहिला आहे. त्यातील एका दृश्यात शाहरुख खान म्हणजेच ‘राज’ निघाल्यानंतर ऐनवेळी काजोल म्हणजेच ‘सिमरन’ रेल्वे स्थानकावर पोहचते. मात्र, तोपर्यंत रेल्वे गती पकडते. तरीही राजने हात दिल्याने सिमरन रेल्वे पकडण्यात यशस्वी होते. याच दृश्याचा आधार घेऊन मध्य रेल्वेने प्रवाशांना सिमरन आणि राजसारखे वागू नका… जबाबदारीने वागा… वेळेवर पोहचा… तुम्हाला मदत करण्यासाठी तिथे कोणताही ‘राज’ थांबलेला नाही,” असा फिल्मी स्टाईल संदेश देत अपघात टाळण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपटातील दृश्याचा संदर्भ देत रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना धोकादायक स्टंट, धावत्या रेल्वेत चढणे-उतरणे आणि शेवटच्या क्षणी रेल्वे पकडण्याच्या प्रवृत्तीपासून दूर राहण्याचेही आवाहन केले आहे. दररोज लाखो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या लांब पल्ल्याच्या तसेच उपनगरीय रेल्वे मार्गावर घाईगडबडीत धावत्या गाडीत चढण्याचा किंवा उतरतानाचा प्रयत्न अनेकदा जीवघेणा ठरतो. विशेषतः कार्यालयीन वेळांमध्ये प्लॅटफॉर्मवर होणारी प्रवाशांची गर्दी आणि नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अनेक गंभीर अपघात घडत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेने सामाजिक संदेश देणारी नवी मोहीम हाती घेतली आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या लोकप्रिय चित्रपटातील ‘राज’ आणि ‘सिमरन’ या पात्रांचा संदर्भ वापरत रेल्वेने प्रवाशांना वास्तवाची जाणीव करून देण्याचा प्रयत्नही केला आहे.
चित्रपटात शेवटच्या क्षणी धावती गाडी पकडण्याचे दृश्य रोमँटिक वाटत असले तरी प्रत्यक्ष आयुष्यात असे प्रयत्न जीवघेणे ठरू शकतात, असा इशारा देखील रेल्वे प्रशासनाने दिला आहे. मध्य रेल्वेकडून समाज माध्यमाद्वारे हा संदेश प्रसारित केला जात आहे. “उशीर झाला तरी चालेल, पण सुरक्षित राहा”, “धावती ट्रेन पकडू नका”, “फुटबोर्डवर प्रवास टाळा” आणि “वेळेपूर्वी स्थानकावर पोहोचा” असे संदेशही मोहिमेतून दिले जात आहेत. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विषेषतः उपनगरीय रेल्वे मार्गावर दरवर्षी शेकडो प्रवासी निष्काळजीपणामुळे अपघातांना बळी पडतात. धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न, प्लॅटफॉर्म आणि रेल्वेतील अंतर, मोबाईलमध्ये गुंतून ट्रॅक ओलांडणे आणि दरवाज्याजवळ उभे राहणे ही अपघातांची प्रमुख कारणे असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करताना, “एक गाडी चुकली तरी दुसरी मिळेल; पण जीवाला पर्याय नाही,” असा भावनिक संदेशही दिला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दल, स्थानक व्यवस्थापन आणि घोषणांद्वारे सातत्याने जनजागृती सुरू असून, या मोहिमेला प्रवाशांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, समाज माध्यमावरील मध्य रेल्वेच्या या मोहिमेची मोठ्या प्रमाणावर चर्चाही आहे. अनेकांनी या कल्पक संदेशाचे स्वागत केले आहे. तर काही प्रवाशांनी गर्दीच्या वेळी अतिरिक्त फेऱ्या वाढविण्याची मागणी करत सुरक्षित प्रवासासाठी प्रशासनाने अधिक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
