जळगाव : मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)–हटिया तसेच एलटीटी–संतरागाछी दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या विशेष गाड्यांमुळे मुंबई, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार असला, तरी जळगावकरांवर मात्र अन्याय होणार आहे.
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक टर्मिनस–हटिया या मार्गावर एकूण १८ विशेष सेवा चालवण्यात येणार आहेत. ०८६१० ही साप्ताहिक विशेष गाडी २२ एप्रिल पासून १७ जून २०२६ पर्यंत दर बुधवारी पहाटे ५.०० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल. आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.०० वाजता हटिया येथे पोहोचेल. परतीच्या दिशेने ०८६०९ ही गाडी २० एप्रिल ते १५ जून २०२६ या कालावधीत दर सोमवारी दुपारी ४.२० वाजता हटियाहून सुटेल. आणि तिसऱ्या दिवशी पहाटे १२.४० वाजता मुंबईत पोहचेल. या गाड्यांना दोन्ही बाजुने ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा आणि राउरकेला या प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. जळगाव स्थानकावर मात्र थांबा देण्यात आलेला नाही.
लोकमान्य टिळक टर्मिनस–संतरागाछी
या मार्गावर एकूण २६ विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ०१००१ ही साप्ताहिक विशेष गाडी २१ एप्रिल ते १४ जुलै २०२६ दरम्यान दर मंगळवारी रात्री ८.१५ वाजता मुंबईहून सुटेल. आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ५.०० वाजता संतरागाछी येथे पोहचेल. परतीच्या दिशेने ०१००२ ही गाडी २३ एप्रिल ते १६ जुलै २०२६ या कालावधीत दर गुरुवारी दुपारी ३.५० वाजता संतरागाछी स्थानकावरुन सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या मार्गावर ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खरगपूर या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. जळगावला थांबा देण्यात आलेला नाही.
रविवारपासून आरक्षण सुरु
संतरागाछी विशेष गाड्यांची संरचना देखील प्रवाशांच्या सोयीप्रमाणे आखण्यात आली असून, त्यामध्ये दोन वातानुकूलित द्वितीय श्रेणी, १० वातानुकूलित तृतीय (इकॉनॉमी) श्रेणी, चार शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी डबे आणि दोन जनरेटर डबे यांचा समावेश आहे. या रचनेमुळे मध्यम व किफायतशीर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक जागा उपलब्ध होणार आहे. ०८६१० गाडीचे आरक्षण ५ एप्रिलपासून सुरू होणार असून, प्रवासी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीच्या अधिकृत संकेतस्थळावरून तिकीट आरक्षित करू शकतात. याशिवाय रेलवन या मोबाईल ॲपद्वारेही बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे. गाड्यांच्या अचूक वेळापत्रकासाठी आणि थांब्यांवरील वेळ जाणून घेण्यासाठी भारतीय रेल्वेच्या संकेतस्थळाचा तसेच एनटीईएस ॲपचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
