मनमाड – मध्य रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून लोकमान्य टिळक टर्मिनस ते हुजूरसाहेब नांदेड विशेष गाडी २३ जानेवारीपासून चालविणार आहे. या विशेष गाडीचा लाभ नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड या शहरांनाही होणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते हुजूर साहेब नांदेड विशेष गाडीच्या चार फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक ०१०४१ ही विशेष गाडी २३ आणि २४ जानेवारी रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १५.३० वाजता सुटेल. आणि दुसऱ्या दिवशी हुजूर साहेब नांदेड येथे ०४.०० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०४२ विशेष गाडी २४ आणि २५ जानेवारी रोजी हुजूर साहेब नांदेड येथून २३.३० वाजता सुटेल. आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे १३.४० वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नागरसोल, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी आणि पूर्णा हे थांबे देण्यात आले आहेत.

या गाडीत एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी, आठ शयनयान, चार सामान्य द्वितीय, दोन सामान्य तृतीय असे डबे राहणार आहेत. या विशेष गाडीच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रक जाणून घेण्यासाठी http ://www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, मनमाड रेल्वे स्थानकातील विकास कामांची मध्य रेल्वेचे महाप्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांनी पाहणी केली. मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात प्रवासी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत कामकाज अधिक प्रभावीपणे राबविण्याची आणि विकास कामे वेळेत गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश गुप्ता यांनी दिले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गुप्ता यांनी मनमाड, भुसावळ विभागाची पाहणी केली. मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात त्यांनी विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या विकास कामांचीही पाहणी केली. मनमाड -भुसावळ दरम्यानच्या सखोल सुरक्षा यंत्रणेचीही पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी रेल्वे संचालन, कार्यक्षमता, सुरक्षा तसेच सुरू असलेल्या विकासात्मक कामांचा आढावा घेतला.

मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकातील फलाटांची तपासणी करून प्रवासी सुविधा देखभाल व्यवस्था व सुरक्षेच्या संबंधीच्या बाबींचा आढावा घेतला. भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनित अग्रवाल यांच्यासह मुख्यालयातील प्रधान विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते. भुसावळ विभागात मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकाचे महत्व अधिक आहे. या स्थानकमार्गे दररोज हजारो प्रवासी प्रवास करीत असतात. मनमाड रेल्वे स्थानकात अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न करण्यात येत आहे.