नाशिक – घाट मार्गातील जमिनीची धूप रोखून रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी मध्य रेल्वेने ‘व्हेटिव्हर बायोइंजिनिअरिंग’चा अवलंब केला आहे. दक्षिण-पूर्व घाट विभागात ५३०० चौरस मीटर क्षेत्रात व्हेटिव्हर गवताची प्रायोगिक लागवड करण्यात आली आहे. उतारांची स्थिरता वाढविण्यासाठी पारंपरिक अभियांत्रिकी उपायांसोबत या निसर्गाधारित उपायाची परिणामकारकता तपासण्यात येत आहे.

मध्य रेल्वेच्या भोर घाटातील कर्जत-लोणावळा आणि थाळ घाटातील कसारा-इगतपुरी या मार्गांवर पावसाळ्यात मातीची धूप, पाण्याचा वेगवान प्रवाह, दगड कोसळणे आणि भूस्खलनाचा धोका असतो. त्यामुळे रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षिततेसमोर आव्हान निर्माण होते. या पार्श्वभूमीवर, उतारांचे नैसर्गिक पद्धतीने स्थिरीकरण करण्यासाठी व्हेटिव्हर गवताचा वापर करण्याच्या शक्यता मध्य रेल्वेकडून पडताळल्या जात आहेत.

जागतिक स्तरावर ‘व्हेटिव्हर सिस्टीम’अंतर्गत जैव-अभियांत्रिकी वनस्पती म्हणून व्हेटिव्हर गवताचा वापर केला जातो. त्याची मुळे जमिनीत खोलवर जाऊन तंतुमय जाळे तयार करतात. त्यामुळे माती बांधून ठेवण्यास मदत होते. हे गवत पृष्ठभागावरील पाण्याचा वेग कमी करते, वाहून येणारा गाळ अडवते आणि उतारावरील धूप रोखण्यास मदत करते. १२ ते २४ महिन्यांत हे गवत तीन ते चार मीटरपर्यंत वाढू शकते. त्याच्या मुळांमुळे मातीचा कातरण प्रतिरोध सुमारे ३० ते ४० टक्क्यांनी वाढण्यास मदत होत असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.

५३०० चौरस मीटर क्षेत्रात लागवड

दक्षिण-पूर्व घाट विभागात भरावाच्या संरक्षणासाठी व्हेटिव्हरची प्रायोगिक लागवड करण्यात आली आहे. खंडाळा- मंकी हिल विभागात अप मार्गालगत १०५० चौरस मीटर क्षेत्रात, तर ठाकूरवाडी केबिन-पळसदरी विभागात मिड-लाइनलगत ४२५० चौरस मीटर क्षेत्रात लागवड करण्यात आली आहे. घाट मार्गातील उतार आणि भरावांवर समोच्च रेषांमध्ये व्हेटिव्हरची कुंपणे लावण्यात येत आहेत. जमिनीतील खोलवर जाणारी मुळे माती धरून ठेवतात, तर दाट पर्णसंभार पाण्याचा प्रवाह कमी करण्याचे काम करतो. त्यामुळे घळई निर्माण होणे रोखले जाते, पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते आणि गाळ अडवला जातो. कालांतराने या प्रक्रियेतून उतारावर नैसर्गिक पायऱ्यांसारखी रचना तयार होऊन स्थैर्य वाढण्यास मदत होते.

दरडी, राडारोडा रोखण्यास मदत

व्हेटिव्हरच्या या नैसर्गिक उपायामुळे घाट विभागातील मातीची धूप आणि उतारांची अस्थिरता कमी होण्याची अपेक्षा आहे. परिणामी रुळांवर दरडी किंवा राडारोडा कोसळण्याच्या घटना कमी करण्यास मदत होऊ शकते. पावसाळ्यात रेल्वे वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्याबरोबरच पारंपरिक संरक्षणात्मक उपाययोजनांच्या देखभालीवरील खर्च कमी करण्यासही या उपायाचा उपयोग होण्याची शक्यता आहे.