जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात बिलाखेड गावाजवळ भरधाव मोटारीने रस्ता ओलांडणाऱ्या तीन महिलांना धडक दिल्याच्या भीषण अपघाताला तब्बल १८ तास उलटून गेले, तरी अपघातास कारणीभूत ठरलेल्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल न झाल्याने पोलिसांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, संबंधित मोटार चालक हा एका लोकप्रतिनिधीचा मुलगा असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकाच्या अपघाती मृत्यूप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल होतो, मग या प्रकरणात विलंब का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बिलाखेडजवळ तीन महिला रस्ता ओलांडत असताना चाळीसगावकडून मालेगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात सुशीलाबाई वंजारी (५०, रा. रामवाडी, बिलाखेड) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुनीता संजय वंजारी (४०) आणि संगीता पोपट कोळी (४५) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर संतापाचा उद्रेक

अपघाताची तीव्रता एवढी होती की, सुशीलाबाई वंजारी यांचा मृतदेह मोटारीची समोरील काच फोडून चालकाच्या बाजूच्या आतील भागात लोंबकळत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी जखमी महिलांना तातडीने रुग्णालयात हलविले आणि घटनास्थळी पोलिसांना पाचारण केले. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमितकुमार मनेळ हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, वारंवार अपघात होत असूनही बिलाखेडजवळ आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचा आरोप तसेच चालकावर कठोर कारवाईची मागणी करत ग्रामस्थांनी रात्रीच रास्ता रोको आंदोलन सुरू केले. मंगळवारी रात्रीच्या रास्ता रोकोनंतर बुधवारी दुपारीही ग्रामस्थांनी पुन्हा रस्ता अडवून आंदोलन केले. पोलिसांनी ग्रामस्थांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपघातातील चालकाविरुद्ध ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.

चालक लोकप्रतिनिधीचा मुलगा

या प्रकरणात सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे अपघातातील मोटार चालकाची राजकीय पार्श्वभूमी. संबंधित चालक हा एका लोकप्रतिनिधीचा मुलगा असल्याचा दावा करण्यात आला आहे. अपघाताच्या वेळी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. मात्र, चालक लोकप्रतिनिधीचा मुलगा असल्याची तसेच तो मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याची अधिकृत पुष्टी पोलिसांकडून अद्याप करण्यात आली नाही. त्यामुळे या दोन्ही बाबींची चौकशी होणे आवश्यक आहे.

१८ तासांनंतरही गुन्हा का नाही?

अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी आहेत. मोटार चालक पोलिसांच्या ताब्यात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. असे असतानाही घटनेला १८ तास उलटून गेल्यानंतरही संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल न झाल्याने ग्रामस्थांच्या संतापात भर पडली आहे. चालक पोलिसांच्या ताब्यात आहे, घटनास्थळी पोलीस पोहोचले आहेत, अपघातात एकाचा मृत्यू आणि दोन जणी गंभीर जखमी आहेत; मग गुन्हा दाखल करण्यासाठी नेमका कोणता अडथळा आहे? असा सवाल आता उपस्थित होत आहे. ग्रामस्थांनी राजकीय दबावामुळे चालकाची अपघातानंतर लगेच वैद्यकीय चाचणी करण्यात आली नसल्याचीही शंका व्यक्त केली आहे. पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी ग्रामस्थांकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.