जळगाव : जिल्ह्यातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या चाळीसगाव शहराने स्वतंत्र जिल्हा निर्मितीकडे आणखी एक ठोस पाऊल टाकले आहे. शहरात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयास मंजुरी मिळाल्याने प्रशासकीय आणि न्यायिक पातळीवर मोठी उभारणी झाली आहे. यापूर्वीच चाळीसगावात स्वतंत्र आरटीओ कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय आणि अपर जिल्हाधिकारी कार्यालय कार्यान्वित झाल्यामुळे जिल्हास्तरीय सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत आहेत.
चाळीसगाव तालुका भौगोलिकदृष्ट्या खूप मोठी असून, लोकसंख्याही गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक वर्षांपासून या तालुक्यातील नागरिकांना महसूल, न्यायालयीन, आरोग्य आणि परिवहन विभागाशी संबंधित कामांसाठी सुमारे १०० किलोमीटर अंतरावरील जळगावात जावे लागत होते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा खर्च होत असे.
या पार्श्वभूमीवर, स्थानिक पातळीवरच प्रशासकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या स्थापनेमुळे आता चाळीसगावमध्ये गुन्हेगारी, दिवाणी आणि फौजदारी प्रकरणांच्या सुनावण्या होऊ शकणार आहेत. यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली निघण्यास गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा निर्णय विशेष दिलासा देणारा ठरणार आहे.
आर्थिक आणि सामाजिक परिणाम
नवीन जिल्हा व सत्र न्यायालयामुळे वकील, लिपिक, सहाय्यक कर्मचारी तसेच न्यायालयीन कामकाजाशी संबंधित व्यवसायांना चालना मिळणार आहे. शहरात कायदेविषयक सेवा, दस्तऐवज लेखन, स्टॅम्प विक्री, भाडे करार, इतर कायदेशीर प्रक्रिया यांसाठी स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती वाढेल. परिणामी चाळीसगावच्या अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची शक्यता आहे.
आरटीओ कार्यालयामुळे वाहन नोंदणी, लायसन्स, वाहन तपासणी यांसारखी कामे स्थानिक पातळीवरच होत आहेत. उपजिल्हा रुग्णालयामुळे आरोग्य सेवांचा दर्जा उंचावला असून रुग्णांची जिल्हा रुग्णालयात जाण्याची गरज कमी झाली आहे. अपर जिल्हाधिकारी कार्यालयामुळे महसूल आणि प्रशासकीय निर्णय प्रक्रियेला वेग आला आहे. या सर्व सुविधा लक्षात घेता चाळीसगाव प्रशासकीयदृष्ट्या स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांची भूमिका
दरम्यान, चाळीसगावमधील विकासात्मक जडणघडणींविषयी बोलताना आमदार मंगेश चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली आहे. नागरिकांच्या विश्वासाला सार्थ ठरविण्यासाठी प्रशासकीय सुविधांचा बॅकलॉग असलेल्या चाळीसगावला न्याय मिळवून देणे ही माझी जबाबदारी होती. जनतेच्या सोयीसाठी आणि विकासाच्या दृष्टीने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय हे ऐतिहासिक पाऊल आहे. जनतेच्या विश्वासाला आपण कधीही तडा जाऊ देणार नाही. प्रत्येक वेळी चाळीसगावकरांना नवीन काही तरी देऊ, अशा शब्दांत आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आमदार चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात आणखी काही शासकीय विभाग, पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्प चाळीसगावमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्वतंत्र जिल्ह्याची मागणी बळकट
चाळीसगावला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळावा, ही मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. प्रशासकीय सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत असल्याने ही मागणी अधिक ठोस होत चालली आहे. स्वतंत्र जिल्हा निर्मितीसाठी आवश्यक असलेली प्रशासकीय यंत्रणा, न्यायालयीन सुविधा, आरोग्य व्यवस्था आणि महसूल कार्यालयांची उभारणी हे महत्त्वाचे निकष मानले जातात. त्या दृष्टीने चाळीसगाव सक्षम होत असल्याचे चित्र दिसत आहे. चाळीसगावच्या सर्वांगीण विकासासाठी ही निर्णायक पायरी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
