नंदुरबार – राज्यातील सत्तेत सहभागी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विधानसभा निवडणुकीपासून जिल्ह्यात सुरु असलेली धुसफूस थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाचे महत्व मांडताना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या पराभवाचे उदाहरण देत देशात नंगट लोकांचे राज्य सुरु असल्याची टीका केली. या टिकेमुळे भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.
जिल्ह्यातील शहादा येथील मीरा प्रताप लॉन्स या ठिकाणी १८ जुलै रोजी शिंदे गटाच्या वतीने एसआयआर मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी, , लोकसभा मतदारसंघ प्रभारी शिरीष चौधरी हेही उपस्थित होते. मेळाव्यात काही कार्यकर्त्याचा शिंदे गटात पक्ष प्रवेशही झाला. या मेळाव्यातील आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या भाषणातील काही विधाने आता समाज माध्यमात प्रसारित झाल्याने भाजपमध्ये नाराजी पसरली आहे.
मेळाव्यात एसआयआर मोहिमेचे महत्व मांडतांना रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना पश्चिम बंगालच्या निवडणूकीचे उदाहरण दिले. “ममता बॅनर्जी इतक्या सहजपणे पराभूत होणे शक्य नव्हते. एसआयआरच्या माध्यमातून ९० लाख मतदार कमी झाले. बॅनर्जी यांना मतदान करणारे अल्पसंख्यांक समाजाचेच मतदार कमी झाल्याने त्यांचा पराभव झाला”, असे रघुवंशी यांनी सांगितले. “याबाबत बॅनर्जी या न्यायालयात गेल्या असून ज्या स्ट्रॉंगरुममध्ये इव्हीएम ठेवण्यात आले होते, त्यालाच आग लावून देण्यात आल्याने आता न्यायालय काय निकाल देणार”, असा प्रश्न उपस्थित करुन “इतने नंगे लोगोंका राज हैं इस देश मे”, असे म्हणत त्यामुळे शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने एसआयआर मोहिमेकडे दुर्लक्ष न करता वाड्या-पाड्यांवर जावून मतदारांचे अर्ज भरुन घ्यावेत, असा सूचना रघुवंशी यांनी दिल्या.
रघुवंशी यांनी केलेले आरोप भाजपच्या चांगलेच जिव्हारी लागले असून जिल्हाध्यक्ष नीलेश माळी यांनी संबंधित वक्तव्यावरुन रघुवंशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रघुवंशी यांच्या वक्तव्याची चित्रफित स्वत:च्या समाज माध्यमातील खात्यांवर ठेवून वरिष्ठांचे लक्ष या विषयाकडे वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
एसआयआर मोहिमेचे महत्व लोकांना समजाविण्यासाठी पश्चिम बंगालचे उदाहरण दिले. बीएलओ शासकीय कर्मचारी आहेत. ते त्यांचे काम करुन निघून जातील. परंतु, सरंपचपदापासून सर्व निवडणुका आपल्याला लढायच्या आहेत. त्यामुळे ही मोहीम महत्वाची असल्याचे मेळाव्यात सांगितले. – चंद्रकांत रघुवंशी (आमदार, शिवसेना शिंदे गट)
