नाशिक – दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील चांदवड, दिंडोरी व निफाड तालुक्यांतील दुष्काळसदृश परिस्थितीग्रस्त गावांचा ट्रिगर-१ मध्ये समावेश करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) खासदार भास्करराव भगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. हे तिन्ही विधानसभा मतदारसंघ सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार) आहेत. यातील दिंडोरी विधानसभेचे प्रतिनिधित्व खुद्द अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ करतात. ग्रामीण भागातील हे तीन तालुके दुष्काळी यादीतून वगळल्याने राजकारण तापले आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील चांदवड, दिंडोरी व निफाड तालुक्यांतील अनेक गावांमध्ये पावसाचे असमान वितरण, पावसातील मोठे खंड आणि पिकांना आवश्यक त्या कालावधीत पुरेसा पाऊस न झाल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, संबंधित गावांचा दुष्काळ ट्रिगर-१ मध्ये समावेश करण्याबाबत खासदार भास्करराव भगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन मागणी केली आहे.
या तीनही तालुक्यांतील परिस्थितीचा विचार करताना केवळ तालुक्याच्या सरासरी पर्जन्यमानाची आकडेवारी न पाहता गावनिहाय पर्जन्यमान, पावसातील खंड, पिकांची सद्य:स्थिती, जमिनीची जलधारण क्षमता आणि उपलब्ध जलस्रोत यांचा वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करणे आवश्यक असल्याकडे खासदार भगरे यांनी पत्रातून लक्ष वेधले आहे.
उत्पादनात घट होण्याची स्थिती…
काही भागांमध्ये हलकी व डोंगराळ जमीन असून पावसातील खंडाचा पिकांवर मोठा परिणाम होत आहे. खरीप पिकांना आवश्यक त्या कालावधीत ओलावा उपलब्ध न झाल्याने पिकांची वाढ खुंटण्याची तसेच उत्पादनात घट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित गावांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीची नोंद घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
प्रभावित गावांची वस्तुनिष्ठ पाहणीची मागणी
चांदवड, दिंडोरी आणि निफाड तालुक्यांतील दुष्काळसदृश परिस्थितीने प्रभावित गावांची गावनिहाय वस्तुनिष्ठ पाहणी करून, पात्र गावांचा दुष्काळ ट्रिगर-१ मध्ये समावेश करावा, तसेच यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाला आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी खासदार भास्करराव भगरे यांनी केली आहे. पाहणीअंती पात्र ठरणाऱ्या गावांना शासनाच्या दुष्काळ व नैसर्गिक आपत्तीविषयक निकषांनुसार उपलब्ध असलेल्या उपाययोजना व मदतीचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
