मालेगाव : भाव घसरल्याने कांदा व मका मातीमोल भावाने विकावा लागत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून चांदवड बाजार समिती आवारात बेमुदत उपोषण सुरू केले होते. हे आंदोलन चिघळण्याची चिन्हे असतानाच शासनाचे प्रतिनिधी म्हणून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी आंदोलन स्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. कांदा व मका दराबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी शेतकरी प्रतिनिधींची बैठक घडवून आणण्याची हमी यावेळी भुसे यांनी दिली. ही शिष्टाई यशस्वी झाल्याने शेतकऱ्यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

गेल्या दोन महिन्याच्या कलावधीत कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. सद्यःस्थितीत ८०० ते ९०० रूपये प्रति क्विंटलपर्यंत हे दर खाली आले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी रडकुंडीस आला आहे. मक्याची परिस्थिती सुद्धा यापेक्षा वेगळी नाही. शासनाने आधारभूत किंमतीत जागोजागी मका खरेदी केंद्रे सुरू केली असली तरी, नोंदणी करुनही खरेदी केंद्रांद्वारा मका खरेदी होत नाही.

शासनाकडून संबंधित केंद्रांना खरेदीचे अत्यंत कमी लक्ष्य दिले जात आहे. त्यामुळे ही समस्या उद्भवली असून शेतकऱ्यांना नाईलाजाने हा मका खाजगी व्यापाऱ्यांना विक्री करावा लागत आहे. मकाचा हमीभाव २४०० रुपये प्रति क्विंटल असला तरी शासनाच्या खरेदी केंद्रांवर मका खरेदी होत नसल्याने बाजार समित्यांमध्ये जवळपास दीड हजार रुपये या पडत्या दराने शेतकऱ्यांना मका विक्री करावा लागत आहे. कांद्यासह मक्याच्या बाजारभावात झालेल्या तीव्र घसरणीमुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

सध्याच्या दरात उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. एकीकडे बियाणे, खते, औषधे, मजुरी व वाहतूक खर्च प्रचंड वाढले असताना, शेतमालाचे दर मात्र कोसळत असल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गेल्या सोमवारी कांदा लिलावादरम्यान शेतकऱ्यांचा असंतोष उफाळून आला. शासनाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत बाजार समितीच्या आवारातच त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले.

कांद्याला प्रतिक्विंटल ३ हजार रुपये बाजारभाव तसेच कमी दराने विक्री झालेल्या कांद्यास १५०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान राज्य सरकारतर्फे देण्यात यावे,तसेच मका उत्पादक शेतकऱ्यांना देखील अनुदान द्यावे,अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्साठी गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणाची शासन पातळीवरून दखल घेतली जात नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये पसरली होती. गुरुवारी संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढत असताना गुरुवारी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपोषणकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेत सकारात्मक चर्चा केली. चर्चेदरम्यान येत्या चार ते पाच दिवसांत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून आणण्याचे आश्वासन भुसे यांनी दिले. या आश्वासनावर विश्वास व्यक्त करत शेतकऱ्यांनी आपले उपोषण मागे घेतले.

यावेळी झालेल्या चर्चेत खासदार डॉ.शोभा बच्छाव, खासदार भास्कर भगरे, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन आहेर, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी भाग घेतला. या उपोषणात डॉ. सयाजीराव गायकवाड, डॉ. आत्माराम कुंभार्डे, संजय जाधव, विलास अवर,संपतराव वक्ते, विजय जाधव, भिमराव जेजुरे,समाधान जामदार,अनिल ठोके, दशरथ ठाकरे आणि संदीप चव्हाण आदी शेतकरी सहभागी झाले होते.