मंत्री, आमदार यांच्या कामांनाही खीळ, दोन अधिकाऱ्यांना वेतन कपातीची शिक्षा

नाशिक : जलसंपदाच्या येथील कार्यालयात मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार शंकरराव गडाख यांनी सूचविलेली कामेही पुढे सरकत नसल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या निदर्शनास आले. कार्यालयात अनागोंदी असल्याचे ताशेरे ओढत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नागरिकांच्या तक्रार अर्जावर काय कार्यवाही झाली याची कुठेही नोंद नव्हती. या सगळ्याची दखल घेत येत्या सात दिवसांत अर्ज, मागणीपत्र आदींचे दस्तावेजीकरण करण्याचे तसेच दोन अधिकाऱ्यांचे दोन दिवसांचे वेतन कापण्याचे आदेशही कडू यांनी यावेळी दिले. 

मंगळवारी कडू हे नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी त्र्यंबक रस्त्यावरील जलसंपदा विभागाच्या कार्यालयास अकस्मात भेट दिली.

मंत्री आल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. हजेरी पुस्तक मागवून कडू यांनी प्रथम कोण अनुपस्थित आहेत, याची पडताळणी केली. काही अधिकारी गैरहजर असल्याचे लक्षात आले. याची माहिती समजल्यानंतर या विभागाच्या महिला अधिकारी आणि इतरांनी मंत्री जिथे पडताळणी करीत होते, त्या दालनाकडे धाव घेतली. कडू यांनी कार्यालयाकडे येणारे विविध अर्ज, सूचना पत्रांची पाहणी केली. ते कधी आले, त्यावर काय कार्यवाही झाली याची कुठेही नोंद नव्हती. या कागदपत्रात खुद्द मंत्र्यांनी दिलेल्या सूचना आणि अन्य आमदारांच्या पत्राचाही समावेश होता. त्याकडे कार्यालयाकडून गांभिर्याने पाहिले गेले नसल्याचे उघड झाले. यावरून कडू यांनी कार्यालयाच्या हलगर्जीपणावर बोट ठेवले. मंत्री, आमदारांची कामे होणार नसतील तर सामान्यांची कामे कशी होतील, अशा शब्दात अधिकाऱ्यांना सुनावले. मंत्र्यांनी सुचविलेल्या कामांचे काय झाले याची नोंद नव्हती. यास जबाबदार असणाऱ्या दोन अधिकाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचे निर्देश त्यांनी दिले.