scorecardresearch

“बाळासाहेब थोरातांनीच खरं काय सांगावे,” काँग्रेसमधील वादावर छगन भुजबळ यांचा सल्ला

आ. सत्यजित तांबे यांच्याकडून होणारे आरोप पाहता त्यांचा काँग्रेसमध्ये परतण्याचा हेतू दिसत नाही, असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

“बाळासाहेब थोरातांनीच खरं काय सांगावे,” काँग्रेसमधील वादावर छगन भुजबळ यांचा सल्ला
काँग्रेसमधील वादावर छगन भुजबळ यांचा सल्ला (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)

नाशिक – विभागीय पदवीधर मतदारसंघात काँग्रेसमध्ये ऐनवेळी काय झाले हे कळायला मार्ग नाही. कोण दोषी, याचा उलगडा झालेला नाही. खरेतर कुठल्याही पक्षाचा एबी अर्ज देताना-घेताना नाव, मतदारसंघ वा तत्सम सर्व बाबी बारकाईने तपासल्या जातात. आता त्यावर आरोप-प्रत्यारोप होत असल्याने खरं काय घडले, हे माजीमंत्री बाळासाहेब थोरातच सांगू शकतात. आ. सत्यजित तांबे यांच्याकडून होणारे आरोप पाहता त्यांचा काँग्रेसमध्ये परतण्याचा हेतू दिसत नाही, असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघात काँग्रेसच्या एबी अर्जावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विजयी उमेदवार सत्यजित तांबे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. या घटनाक्रमावर भुजबळ यांनी भाष्य केले. आपल्या ५६ वर्षांच्या राजकारणात एबी अर्जात अशा त्रुटी राहिल्याचे बघितलेले नाही. एबी अर्ज देणारा आणि स्वीकारणारा यांच्याकडून त्याची काटेकोरपणे तपासणी केली जाते. या मतदारसंघात डॉ. सुधीर तांबे यांनी चांगले काम केले होते. ऐनवेळी जे घडले ते योग्य नव्हते. ही निवडणूक बिनविरोध होते की काय, अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. त्यांना अल्पकाळात प्रचार करूनही चांगली मते मिळाली, असे भुजबळ म्हणाले.

हेही वाचा – नाशिक : अल्पवयीन मुलांना गुटखा विकणाऱ्या टपरी चालकांविरुद्ध कारवाई

हेही वाचा – नाशिक : धर्मांतराच्या प्रलोभनाने महिलेवर अत्याचार, चार संशयितांना पोलीस कोठडी

तांबे परिवाराने मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात केली होती. त्याचा परिणाम विजयात झाला. काँग्रेसला सोडचिठ्ठी द्यायची असल्याने आमदार तांबे यांच्याकडून गंभीर आरोप होणे स्वाभाविक आहे. या प्रकरणात खरं काय झाले, हे थोरात यांनी सांगायला हवे, असेही भुजबळ यांनी सूचित केले. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात, त्यातही नागपूर आणि अमरावतीत मिळालेला कौल हवेची दिशा बदलल्याचे दर्शविणारा असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 19:46 IST
ताज्या बातम्या