महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र महाराष्ट्र कमकुवत होणार नाही. दिल्लीला देखील आधार देण्याचे काम महाराष्ट्र करतो हे कुणीही विसरू नये, अशी टीका करत महाराष्ट्र कधी झुकला नाही झुकणारही नाही. दिवस येतात आणि दिवस जातात जरा धीर धरा आपले दिवस परत येतील, असा सबुरीचा सल्ला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शेतकरी मेळाव्यात दिला.

हेही वाचा >>>जळगाव – अमृतसरच्या तरुणाचा भुसावळमधील रेल्वे यार्डात मृतदेह

रानवड येथील काकासाहेब येथे स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था पिंपळगाव बसवंत, संचलित कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचा ४० वा गळीत हंगाम शुभारंभ भुजबळ यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, आ. दिलीप बनकर, आ. डॉ.सुधीर तांबे, आ. नरेंद्र दराडे, आ. हिरामण खोसकर,आ. नितीन पवार, आ. सुहास कांदे, माजी खासदार देविदास पिंगळे आदी उपस्थित होते. यावेळी आ. भुजबळ यांनी देशात आणि राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आलेला असून केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, अशी मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांना नको ते प्रश्न विचारण्यापेक्षा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना काय अडचणी आहेत. याची विचारपूस करण्याची गरज असल्याची टीका त्यांनी केली. पक्षभेद असले तरी शेतकरी हितासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. निवडणूका आल्यावर आपआपले झेंडे काढू, मात्र विकासाच्या कामासाठी एक होऊन काम करूया, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा >>>जळगाव : आशियाई यूथ ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत भाग्यश्री पाटील विजेती

निफाड मधील कारखाने सुरू करण्यासाठी आमदार बनकर सातत्याने प्रयत्न करत असून शरद पवार आणि अजित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे रानवड कारखाना सुरू झाला. आता निफाड साखर कारखाना सुरू करण्यासाठी बनकर प्रयत्न करीत असून त्यासाठी त्यांना सर्वांनी पाठिंबा देण्याची आवश्यकता भुजबळ यांनी मांडली. एअरबस प्रकल्पाचे काम जेव्हा टाटा यांना मिळाले त्यावेळी सर्वात प्रथम टाटा यांना पत्र लिहून नाशिकच्या एचएएलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ, हा प्रकल्प नाशिकला द्या, अशी विनंती केली होती. मात्र हा प्रकल्प आता महाराष्ट्राबाहेर गेला आहे. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी ही अतिशय चिंतेची बाब आहे. निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जागेवर ‘ड्रायपोर्ट’ करणार असे काही वर्षांपासून केवळ आपण ऐकत आलो आहे. ते ही आता गुजरातला गेले तर आश्चर्य वाटायला नको, असा टोला त्यांनी हाणला. समाजकारणात लोक पुढे होऊन काम करत असतात. त्यांना सुरक्षा पुरविली जात असते. अशावेळी सुरक्षा काढणे योग्य नाही. याचा पुनर्विचार शासनाने करावा, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, गळीप हंगाम शुभारंभ विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते होणार होते. या बाबत त्यांचा नियोजित दौरा होता. मात्र पवार यांच्या हॅलिकाॅप्टरला तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांना कार्यक्रमास उपस्थित राहता आले नाही.