नाशिक – मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा पवित्रा घेणारे मनोज जरांगे आणि ओबीसीचे नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. अंतरवली सराटी येथे उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या कार्यशैलीवर मंत्री भुजबळ यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारच्या वतीने जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल चर्चेसाठी गेल्या होत्या. त्या वेळी जरांगे यांनी घाणेरड्या भाषेत चर्चा केली. जरांगे यांना सांगून, सांगून सर्व थकले आहेत, आता मी काय सांगणार, असा प्रश्न त्यांनी केला.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या तीन ते चार वर्षांपासून मनोज जरांगे आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यात संघर्ष सुरू आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा अंतरवली सराटी येथे उपोषणाचा मार्ग स्वीकारला. शुक्रवार हा त्यांच्या उपोषणाचा १४ वा दिवस आहे. आपल्या मागण्यांसाठी पुन्हा मुंबईला धडकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून, जरांगे हे मुंबईला जाण्याची तारीख लवकर जाहीर करण्याच्या मार्गावर आहेत. या घटनाक्रमावर ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य करताना मनोज जरांगे यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले.
नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल या सध्या जालना जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सरकारच्या वतीने त्यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केली. मनोज जरांगे यांनी अतिशय घाणेरडी भाषा वापरली. त्यामुळे आशिमा मित्तल याही अस्वस्थ झाल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. जरांगे सध्या कोणालाही सोडत नाहीत.
मुख्यमंत्री फडणवीस काय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री संजय शिरसाठ अशा सर्वांना जरांगे शिव्या देत आहेत, असे भुजबळ यांनी नमूद केले. जरांगे यांच्या मुंबईत धडकण्याच्या इशाऱ्यावर बोलताना, लोकशाहीत काय करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. लोकांना त्रास होणार नाही, हे पाहणे सरकारी यंत्रणेचे काम आहे. सरकार सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. सरकारच्या यंत्रणा काय योग्य, काय अयोग्य ते पाहतील. जरांगे यांना सांगून, सांगून सगळे दमले, मी काय सांगणार, असे भुजबळ म्हणाले.
