नाशिक – कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात खोदकामांमुळे निर्माण झालेल्या धोकादायक स्थितीवरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी ही बाब निषेधार्ह असल्याचे सांगत प्रशासकीय यंत्रणांवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले. खड्डेमय नाशिकची जबाबदारी अधिकाऱ्यांना टाळता येणार नाही. मोठे अधिकारी केवळ कार्यालयात बसण्यासाठी नसतात. ठेके दिले आणि मोकळे झाले, असे चालणार नाही. महापालिका आयुक्त आणि कुंभमेळा आयुक्त यांच्याकडे सर्व कार्यकारी अधिकार आहेत. कारवाई करणारे अधिकारीच डोळेझाक करीत असतील, तर दोषींवर कारवाई कशी होईल, असा प्रश्न उपस्थित करीत भुजबळ यांनी नाकर्त्या अधिकाऱ्यांवर कारवाईची आवश्यकता मांडली.
पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २८ प्रमुख रस्त्यांची कामे एकाचवेळी सुरू करण्यात आली. तसेच पाणीपुरवठा, गटार, गॅस वाहिनी आदी कामांसाठी सर्वत्र खोदकाम करण्यात आले. मुसळधार पावसात खोदलेले रस्ते, सर्वत्र खड्डे आणि चिखलमय स्थितीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली. लहान-मोठे अपघात घडत असून काहींना प्राण गमवावे लागले, तर अनेकजण जायबंदी झाले. मंत्री भुजबळ यांनी या मृत्यूंसाठी महापालिका आणि शासनाला जबाबदार धरले.
नाशिकमध्ये जे सुरू आहे, ते निषेधार्ह असून असंतोषाचा उद्रेक होण्याची वाट पाहू नये, असे ते म्हणाले. मनपा आयुक्त मनीषा खत्री आणि कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांचा नामोल्लेख न करता त्यांनी उभयतांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी या विषयात लक्ष घालावे, अशी सूचना त्यांनी केली. डॉ. गेडाम हे उत्कृष्ट अधिकारी असून नाशिकच्या रस्त्यांवर फिरून काय चालले आहे, ते त्यांनी पाहायला हवे. इतर अधिकाऱ्यांवर सर्व काही सोडून ते थांबले, तर ते त्यांचेही अपयश मानले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
ठेकेदारांच्या कामांकडे लक्ष द्या…
कुंभमेळ्याच्या कामांचे ठेके देऊन अधिकाऱ्यांना मोकळे होता येणार नाही. संबंधित ठेकेदार काय करतो, रस्त्याच्या एका बाजूला काम सुरू असताना दुसरी बाजू खड्डेविरहित आहे की नाही, हे त्यांनी पाहायला हवे. ठेकेदारांकडून तसे काम करून घेतले पाहिजे, असेही त्यांनी खडसावले.
जबाबदारी ढकलता येणार नाही…
कुंभमेळ्यासाठी शहरात सुरू असलेल्या कामांची जबाबदारी महापालिका आणि कुंभमेळा प्राधिकरण यांना परस्परांवर ढकलता येणार नाही. हे आपले काम नाही, असे चालणार नाही; जबाबदारी घ्यावीच लागेल. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा किंवा बांधकामे अशा प्रत्येक गोष्टीची जबाबदारी महापालिकेची आहे. कुंभमेळ्याच्या कामात काही अडचण असेल, तर महापालिकेने ती प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून द्यायला हवी. शहरातील चांगल्या रस्त्यांची दुर्दशा होत असताना मनपा आयुक्तांना जाब विचारण्याचा अधिकार आहे. महापौर, नगरसेवक यांच्याकडे कार्यकारी अधिकार नसून ते केवळ विचारविनिमय व विनंती करू शकतात. सर्व कार्यकारी अधिकार महापालिका आयुक्त आणि कुंभमेळा आयुक्त यांच्याकडे आहेत. त्यामुळे असंतोषाचा उद्रेक होण्याची वाट पाहू नका, असे मंत्री छगन भुजबळ यांनी फटकारले.
