नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर दिल्लीत जाण्याची पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची संधी अखेर हुकली. ही संधी कदाचित त्यांना मिळालीही असती. परंतु, आपण राज्यसभेवर गेल्यावर महाराष्ट्रात आपल्या जागी पुतणे समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी देण्याची त्यांची अट नडली. त्यामुळे राजेंद्र जैन यांची लाॅटरी लागली. आपणास संधी न मिळाल्याने नाराज छगन भुजबळ यांनी आपण बुध्दिबळचे नव्हे तर, कबड्डीचे खेळाडू असल्याचे सांगितले. यानिमित्ताने मुरब्बी राजकारणी असलेले छगन भुजबळ यांच्या आवडी तरी कोणकोणत्या याची चर्चा होऊ लागली आहे.

छगन भुजबळ यांनी आपण खासदार झाल्यावर पुतणे समीर भुजबळ यांना महाराष्ट्रात मंत्री करण्याची अट ठेवल्यानंतर त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रातील वरिष्ठांशी यासंदर्भात चर्चा करावी लागेल, असे नमूद केले होते. त्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून भुजबळ यांचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. त्यामुळे नाराज झालेल्या छगन भुजबळ यांनी माध्यमांकडे आपली भावना व्यक्त केली.”राज्यसभा आणि लोकसभेवर जाण्याची संधी आपणास चार ते पाच वेळा आली होती. पण दुर्देवाने ती मिळाली नाही. यावेळी देखील राज्यसभेवर जाण्याची संधी होती. पण ती देखील मिळाली नाही. राष्ट्रवादीचे मकरंद पाटील मंत्री आहेत. त्यांचे भाऊ खासदार आहेत. सुनेत्रा पवार मंत्री, पुत्र खासदार, सुनील तटकरे खासदार पुत्र आमदार, त्यामुळे मलाही हाच नियम लागू करावा, अशी विनंती केली. त्यावर संवाद साधण्यासाठी वेळ लागला असावा”, असे त्यांनी सांगितले.”मी नाराज नसून, इतरांना जो न्याय दिला तोच मला लावावा, असे म्हटले होते. अन्याय काय, हे चालायचंच आता. आज नही तो कल , कल नही तो परसो, असे आमचे धोरण आहे.” मैं कबड्डी का खिलाडी हूं, शतरंज का खिलाडी नही ”, असे चतुराईपूर्वक उत्तर भुजबळ यांनी दिले.

बुध्दिबळ आपल्याला जमत नाही. आपण कबड्डीचे खेळाडू आहोत, असे सांगणारे छगन भुजबळ हे खरोखरच एक विलक्षण व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटचीही त्यांना आवड आहे. राजकारणात असूनही त्यांनी आपल्या आवडी जोपासल्या. भुजबळ यांना कला क्षेत्राची पूर्वीपासून ओढ. आपल्यातील अंगभूत कलागुणांचा उपयोग त्यांना १९८६ मध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरुन उठलेल्या आंदोलनावेळी झाला. त्यावेळी महाराष्ट्रातल्या नेत्यांना कर्नाटकमध्ये प्रवेशबंदी होती. त्यावेळी शिवसैनिक असलेले छगन भुजबळ हे बुल्गानिन दाढी, डोक्यावर फेल्ट हॅट, पांढऱ्या रंगाचा कोट आणि हातात पाईप अशा अवतारात बेळगावात दाखल झाले होते. एवढेच नव्हे तर, त्याठिकाणच्याोका मैदानात आक्रमकपणे भाषणही केले होते. नाटक, सिनेमाच्या आवडीमुळे छगन भुजबळ यांनी तीन मराठी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकाही केल्या. ‘दैवत’ (१९८२), ‘मर्दानी’ (१९८३) आणि ‘नवरा बायको’ (१९८९) हे ते चित्रपट होय. ‘नवरा बायको’ या चित्रपटाचे ते निर्मातेही होते. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत अशोक सराफ होते.

भुजबळ यांना जुनी मराठी गाणी, लावण्या आणि लोककलांचीही आवड आहे. भुजबळ यांचे चित्रपट-नाट्यसृष्टीतील अनेकांशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळेच कधीकाळी त्यांनी सुरु केलेला नाशिक महोत्सव आणि येवला महोत्सव या कार्यक्रमांच्या समारोपात हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांसह गायक, संगीतकार यांनाही त्यांनी आमंत्रित केले होते. (उदा. सुनील शेट्टी, सुरेश वाडकर) भुजबळ यांना वाचनाचीही आवड आहे.सामाजिक इतिहासाशी संबंधित पुस्तके, तसेच राजकीय आत्मचरित्रे त्यांना आवडतात.