नाशिक – नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे अर्थकारण ज्यावर अवलंबून असते, अशा कांदा पिकाला काही महिन्यांपासून अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. मागील आठवड्यात नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनातून हा संताप उफाळून आल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कांदाप्रश्न सोडविण्यासाठी एक उपाय सुचविला आहे.
कांद्याचे प्रति क्विंटलचे दर दिवसेंदिवस घसरत असल्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांमध्ये असंतोष आहे. कांद्याला मिळणाऱ्या कमी दरामुळे मागील आठवड्यात नांदगाव, चांदवड आणि लासलगाव येथे शेतकऱ्यांनी आंदोलन केले. नांदगाव बाजार समितीसमोर तसेच चांदवड येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. महाराष्ट्रातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथे बुधवारी एक हजार रुपयांपेक्षा खाली दर घसरल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले होते. दर वाढल्यानंतर शासन लगेच हस्तक्षेप करते, त्याचप्रमाणे पडलेले भाव सुधारण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. सध्या जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची मोठी आवक होत आहे. बुधवारी लासलगाव बाजार समितीत २७ हजार ३७८ क्विंटल आवक झाली. त्यास किमान ३००, कमाल १४१२ तर, सरासरी ९७५ रुपये दर मिळाले. सकाळी बाजार समितीत दर ४०० ते ८०० रुपयांपर्यंत खाली आल्याने शेतकरी संतापले. त्यांनी लिलाव बंद पाडले.
कांदा दर वाढल्यानंतर सरकार हस्तक्षेप करते. त्याचप्रमाणे पडलेले दर सुधारण्यासाठी शासनाने पाऊले उचलली पाहिजे. शेतकऱ्यांच्या हितासाठी भावांतर योजना राबवावी, अशी मागणी करण्यात आली. बाजार समितीची प्रक्रिया व कामकाज बंद राहू नये, या उद्देशाने चर्चेअंती लिलाव पुन्हा सुरू करण्यात आले.
कांदाप्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालल्याने कांदा उत्पादक अतिशय चिंतेत आहे. कांद्याच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी तातडीने बैठक आयोजित करण्यात यावीस अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात पत्र दिले आहे. नाशिक जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक कांदा उत्पादन करणारा जिल्हा असून येथील हजारो शेतकरी कांदा पिकावर आपला उदरनिर्वाह अवलंबून आहे.
कांदा दरातील चढ-उताराचा थेट परिणाम नाशिक जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांवर होत असतो. राज्यातील विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या अत्यंत बिकट परिस्थितीला तोंड देत आहेत. जानेवारी महिन्यापासून कांद्याचे बाजारभाव प्रतिक्विंटल सुमारे १,००० रुपयांच्या आसपास स्थिरावले होते. आता तर त्यापेक्षाही कमी दर मिळत आहेत. उत्पादन खर्चाच्या तुलनेत हा दर अत्यंत अपुरा व तोट्याचा आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. त्यामुळे कांद्याच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
