नाशिक शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि निष्पाप नागरिकांचे जाणारे जीव यावरून अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “नाशिक एवढे बेकार कधीच नव्हते. सध्याची परिस्थिती पाहता शहर वाऱ्यावर सोडले आहे का?” असा थेट सवाल करत भुजबळ यांनी स्वपक्षीय सरकार आणि स्थानिक प्रशासनाला घरचा आहेर दिला आहे. हा गंभीर विषय आपण थेट मंत्रिमंडळ बैठकीत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“माणसे मरण्यापेक्षा काम दुप्पट झाले तरी चालेल!”
नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आतापर्यंत ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यावर बोलताना भुजबळ आक्रमक झाले. ते म्हणाले, “हे चित्र आमच्या थेट मुळावर येत आहे. रस्त्यांच्या या दुरवस्थेमुळे वाहतूक मंदावते आणि प्रचंड कोंडी होते. यामध्ये पोलीस तरी काय करणार? स्थानिक नगरसेवक वैतागले आहेत आणि महापौरही काही करू शकत नाहीत. कुंभमेळ्यासाठी रस्ते खोदले असतील, तर पर्यायी रस्त्यांची सोय करणे प्रशासनाचे काम आहे. पाऊस ओसरताच तातडीने खड्डे बुजवा. एकाच खड्ड्यावर दुप्पट काम करावे लागले तरी हरकत नाही, पण निष्पाप नागरिकांचे बळी जाता कामा नयेत.”
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि प्रशासनाने यात तातडीने लक्ष घालावे
महापालिका आणि कुंभमेळा प्राधिकरण यांच्यातील परस्परविरोधी कारभारावर भुजबळांनी जोरदार बोट ठेवले. “माझे काम नाही, त्याचे काम आहे… अशी जबाबदारी एकमेकांवर ढकलून चालणार नाही. अधिकारी काही फक्त कार्यालयात बसण्यासाठी नाहीत. शहरात रस्ते, पाणी किंवा बांधकाम – शेवटी प्रत्येक गोष्टीची मुख्य जबाबदारी ही महापालिकेचीच आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, संबंधित प्राधिकरण आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात तातडीने लक्ष घालावे. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा असंतोष उफाळून येईल,” असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.
सर्व मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाखांची भरपाई द्या!
प्रशासकीय निष्काळजीपणामुळेच हे मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करत भुजबळ म्हणाले, “जे लोक मृत्युमुखी पडले आहेत, ते शासन आणि महापालिकेच्या निष्काळजीपणाचे बळी आहेत. एका मृत व्यक्तीच्या कुटुंबाला प्रशासनाने १० लाख रुपयांची मदत दिल्याचे समजते. जसा एकाला न्याय दिला, तशीच १० लाखांची भरपाई खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या सर्व ५ जणांच्या वारसांना मिळाली पाहिजे.”
तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचे भुजबळांकडून समर्थन
दरम्यान, अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या धडक कारवायांचे भुजबळांनी कौतुक केले. “अनेक वर्षांनंतर एफडीए विभागाला खऱ्या अर्थाने जाग आली आहे. तुकाराम मुंढे हे कडक शिस्तीचे आणि धडक निर्णय घेणारे अधिकारी आहेत. काहींना त्यांची कार्यपद्धती कडक वाटत असली, तरी लहान मुलांचे आरोग्य जपण्यासाठी आणि जंक फूडमुळे वाढणारे आजार रोखण्यासाठी अशाच कठोर अधिकाऱ्यांची गरज आहे. मुंढे यांच्या या मोहिमेला माझा पूर्ण पाठिंबा आहे,” असे सांगत भुजबळांनी सनदी अधिकाऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली.
