नाशिक : प्रथम महाविकास आघाडी आणि सत्तांतरानंतर महायुती सरकारमध्येही अन्न व नागरी पुरवठा या एकाच खात्याची जबाबदारी सांभाळणारे मंत्री छगन भुजबळ यांच्या संपत्तीत पाच वर्षात सुमारे साडेतीन कोटींनी वाढ होऊन ती ३१.४३ कोटींवर पोहोचली आहे.
येवला मतदारसंघात राष्ट्रवादीचे (अजित पवार) उमेदवार छगन भुजबळ यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून ही बाब उघड झाली. २००९ ते २०१४ या कालावधीत भुजबळ दाम्पत्याची मालमत्ता लक्षणीय वेगाने वाढली होती. पुढील काळात तिच्या वाढीचा वेग काहिसा मंदावल्याचे प्रतिज्ञापत्रांवरून दिसून येते. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीवेळी भुजबळ दाम्पत्याकडे चल व अचल अशी एकूण २७ कोटी ९२ लाखांची संपत्ती होती. यामध्ये छगन भुजबळांकडे साडेअकरा कोटी तर उर्वरित संपत्ती पत्नीच्या नावे होती. पाच वर्षात भुजबळ दाम्पत्याची एकूण संपत्ती ३१.४३ कोटींवर गेली आहे. सद्यस्थितीतही छगन भुजबळांपेक्षा त्यांची पत्नी अधिक श्रीमंत आहे. भुजबळांची संपत्ती १२.५२ कोटी तर पत्नीच्या नावे १८.९१ कोटींची संपत्ती आहे. पाच वर्षांपूर्वी भुजबळांवर ३८ लाख २४ हजार तर पत्नीच्या नावे १६ लाख ५५ हजार रुपयांचे दायित्व होते. आता भुजबळांचे स्वत:चे कर्ज २४ लाख ५६ हजारावर म्हणजे कमी झाले. तर पत्नीच्या डोक्यावरील कर्जाचा भार वाढून २१ लाखावर गेला आहे.
हे ही वाचा… काँग्रेसमधील असंतोषाचा उद्रेक, पक्ष कार्यालयास कार्यकर्त्यांकडून कुलूप, प्रदेश पदाधिकाऱ्यांचा निषेध
हे ही वाचा… भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील आता मनसेचे उमेदवार
एकूण मालमत्ता – ३१ कोटी ४३ लाख
२०१९ मधील मालमत्ता – २७ कोटी ९२ लाख
सध्याची जंगम (चल) मालमत्ता – तीन कोटी ७० लाख
स्थावर (अचल) मालमत्ता – २७ कोटी ७३ लाख
गुन्हे – सक्तवसुली संचालनालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून विविध कलमांन्वये चार गुन्हे दाखल
शिक्षण – एसएससी आणि मुंबईतील व्हिजेटीआयतून एलएमव्ही (आय) अभ्यासक्रम.