नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणारे विमान बारामती येथील हवाई धावपट्टीलगत झाडाला धडकून जमिनीवर कोसळले. आणि त्यात पवार यांच्यासह इतरांचा मृत्यू झाल्याच्या ‘एएआयबी’च्या प्राथमिक अहवालावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी आश्चर्य व्यक्त केले. उपमुख्यमंत्री पवार यांच्या स्वागतासाठी शेकडो लोक उपस्थित होते. परंतु, कुणीही ते विमान झाडाला धडकल्याचे म्हटले नसल्याचा दाखला त्यांनी दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत महिनाभरानंतर एएआयबीचा प्राथमिक अहवाल आला. यादरम्यान जय पवार यांनी एक चित्रफित समाजमाध्यमात प्रसारित केली होती. त्यात व्हिएसआर कंपनीचे मालक हे वैमानिकाच्या आसनावर झोपलेले दिसत आहे. एएआयबीचा अहवाल आणि जय पवार यांची चित्रफित यावर मंत्री भुजबळ यांनी येथे भाष्य केले.
बारामती येथील धावपट्टी परिसरात शेकडो लोक उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्षा करीत होते. यातील कुणीही विमान झाडावर धडकल्याचे म्हटलेले नाही. चित्रीकरण व प्रत्यक्षदर्शींनी विमानाने पहिल्यांदा धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते पुन्हा निघून गेले. दुसऱ्या प्रयत्नावेळी विमान अगदी शेवटच्या क्षणी कोसळले. आणि विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. वेगाने खाली येत असताना वैमानिकाकडून ते नियंत्रित झाले नसावे. कुणीही झाडाला धडकल्याचे म्हटलेले नसल्याने अहवालात तसा उल्लेख आश्चर्यकारक असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले. जय पवार यांनी प्रसारित केलेल्या चित्रफितीबाबत विमान कंपनीचा मालक वैमानिकाच्या आसनावर अशा प्रकारे झोपलेला असेल तर हा निष्काळजीपणा व माजोरीपणा असल्याचे भुजबळ यांनी सूचित केले. या प्रकरणाची डीजीसीएने चौकशी करावी आणि संबंधितावर कडक कारवाई करावी, असे त्यांनी नमूद केले.
रघुवंशी यांचा दावा फेटाळला
माजी एटीएस प्रमुख के. पी. रघुवंशी यांनी त्यांच्या चरित्रात तत्कालीन गृहमंत्री भुजबळ हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेसाठी खूप उत्सुक होते, असा केलेला दावा मंत्री भुजबळ यांनी फेटाळला. बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेची फाईल माझ्याकडे कोणी हलवली, याचे रघुवंशी यांनी उत्तर द्यावे. पोलीस आयुक्तांनी ते केले होते. आम्ही श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आम्ही ती फाइल परत करू शकलो नाही. तथापि, आपण त्वरित आयुक्तांना सांगितले की पोलिसांनी न्यायालयात ठाकरे यांच्या जामीन अर्जाला परवानगी द्यावी आणि कदाचित जामीन नाकारला तर ‘मातोश्री’ला कारागृह म्हणून जाहीर करून त्यांना घरीच ठेवायचे. शिवसेना-भाजपच्या सरकारमध्ये अनेक फाईल रद्द झाल्या होत्या, नेमकी तीच फाईल आपल्यासमोर आली. दोन्हीकडून आपल्याला अडचण होती. तरी यातून मार्ग काढण्यासाठी आपण शिवसेनाप्रमुख ठाकरे यांना त्रास द्यायचा नाही, अशी सूचना केली होती. पुढे एक प्रकरण झाले, तेही आपण स्वताहून मागे घेतले, याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले.
