नाशिक – दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना येथील महाकवी कालिदास कलामंदिरात सर्वपक्षांच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. अजितदादा यांच्यासंदर्भातील आठवणींना उजाळा देताना अनेकांना गहिवरुन आले. अजितदादा यांचा रोखठोक स्वभाव, त्वरीत निर्णय घेण्याची क्षमता, दिलदारपणा या गुणांचा विशेषत्वाने उल्लेख करण्यात आला.
राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी, सोन्यासारखी माणसे आपल्यातून निघून गेली, ती परत येणार का, असा सवाल केला. मधल्या काळात काही प्रश्नांमुळे मी राजीनामा देण्याच्या तयारीत होतो. त्यावेळी अजित दादांचा फोन आला. तुम्ही शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे आहात. राजीनामा देण्याची गरज नाही, अशी पाठराखण त्यांनी केली. अजितदादा यांच्या विचारावर चालणे, राज्य विकासाच्या वाटेवर नेणे, हीच खरी श्रध्दांजली असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले.
आ. देवयानी फरांदे यांनी महिला रुग्णालयाच्या उभारणीत त्यांचा असणाऱ्या सहभागाची आठवण सांगितली. नव्या जिल्हा परिषदेच्या इमारतीतील सभागृह, मराठा समाज वसतिगृहातील ग्रंथालय, सभागृह किंवा त्या आवाराला अजित दादा पवार यांचे नाव देण्याची मागणी फरांदे यांनी केली. शिवसेना ठाकरे गटाचे दत्ता गायकवाड यांनी अजितदादांना ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व प्रश्नांची जाण होती, असे मांडले. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी, होते. पहिल्यांदा पोलीस खात्यात काम सुरू केले असता तेव्हा अजितदादा मोठ्या भावासारखे वाटल्याचे सांगितले. मी नाशिकला रुजू झाल्यावर अजितदादांनी दुरध्वनीवरून येथे काही अडचण यायला नको, असे ठणकावल्याचेही कर्णिक यांनी नमूद केले.
यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ तसेच ॲड. माणिक कोकाटे, दिलीप बनकर, हिरामण खोसकर, सरोज अहिरे, सीमा हिरे या आमदारांसह विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम तसेच पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रध्दांजली सभेनंतर अजित पवार यांच्या अस्थींचे रामकुंडात विसर्जन करण्यात आले.
येवला येथेही सर्व पक्षाच्या वतीने माऊली लॉन्स येथे श्रध्दांजली सभा झाली. मंत्री छगन भुजबळ, आ. पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार मारोतीराव पवार, माजी आमदार कल्याणराव पाटील, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, पंढरीनाथ थोरे, संभाजी पवार, विश्वासराव आहेर, अरुण थोरात, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, लासलगाव बाजार समितीचे सभापती डी.के.जगताप आदी उपस्थित होते.

