नाशिक - मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी मराठा आरक्षण शांतता फेरीला नाशिक येथील तपोवनातून हजारोंच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी एक मराठा, लाख मराठासह ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संपूर्ण फेरी मार्ग भगवामय झाला आहे. भगव्या टोप्या, भगव्या झेंड्यांनी संपूर्ण रस्ता व्यापला आहे. सात किलोमीटरच्या फेरी मार्गावर सकल मराठा समाजाने ठिकठिकाणी भव्य पुष्पहारांनी जरांगे यांच्या स्वागताची तयारी केली आहे. हेही वाचा >>> नाशिक : शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी मनोज जरांगे यांनी राज्यात ठिकठिकाणी काढलेल्या शांतता फेरीचा नाशिकमध्ये समारोप होत आहे. तपोवनहून निघालेली फेरी जिल्हाधिकारी कार्यालयावर येणार आहे. सीबीएस चौकात भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या जिल्ह्यात या फेरीतून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. ओबीसी सुवर्णकार समितीच्या इशाऱ्यामुळे फेरीवर काळे झेंड्यांचे सावट होते. जरांगे हे दादागिरीच्या माध्यमातून आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची कार्यपध्दती संविधानाला धरून नसल्याचा आरोप ओबीसी सुवर्णकार समितीचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके यांनी केला होता. फेरीच्या दिवशी जरांगे यांना संविधान बचाओचा फलक दाखविला जाईल. त्यांना संविधानाची प्रतही भेट दिली जाईल. जरांगे यांच्या फेरीला काळे झेंडे दाखविले जातील, याचा पुनरुच्चार घोडके यांनी केला होता. मराठा आरक्षणावरून याआधी ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात वाकयुद्ध झाले आहे. जरांगे यांच्या फेरीतून भुजबळांविरोधातील रोष मराठा समाजाने प्रारंभापासून व्यक्त केला. छगन भुजबळ यांच्या विरोधात घोषणाबाजी करुन फेरीला सुरुवात झाली. पंचवटीतील स्वामीनारायण मंदिर चौक-काट्या मारूती चौक- दिंडोरी नाका-पंचवटी कारंजा-मालेगाव स्टँड-रविवार कारंजा-सांगली बँक चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ फेरीचा समारोप होणार आहे. हेही वाचा >>> वडाळा परिसर नाशिक मनपा क्षेत्रात आहे का? पाणी पुरवठ्यासह समस्याग्रस्त मोर्चेकऱ्यांचा प्रश्न कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहर पोलिसांनी दीड हजार कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला आहे. साध्या वेशात कर्मचारी फेरीत सहभागी आहेत. फेरीमार्गावर सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर सीबीएस चौकात मनोज जरांगे संवाद साधतील. फेरीमुळे शहरातील अनेक रस्त्यांवरील वाहतुकीवर निर्बंध घातले गेले. परिणामी वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले. शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आल्यामुळे यंत्रणेवरील भार बराच कमी झाला.वाहतूक निर्बंधाची झळ महानगरपालिकेच्या सिटीलिंक बससेवेलाही बसली. त्यांना अनेक फेऱ्यांमध्ये कपात करावी लागली.