गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा करोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून ते सध्या त्यांच्या नाशिकमधील निवास्थानी विश्रांती घेत आहेत.
येवला दौऱ्यावर असताना बिघडली प्रकृती
छगन भुजबळ हे काल येवला दौऱ्यावर होते. यावेळी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना नाशिकमधील आपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसेच उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना काही वैद्यकीय चाचणी करण्यास सांगितले होते. यामध्ये करोना चाचणीचाही समावेश होता.
हेही वाचा – “ती सावरकर नव्हे, तर अदाणी गौरव यात्रा”; संजय राऊतांचं शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र; म्हणाले, “भाजपाचा…”
यापूर्वीही झाली होती करोनाची लागण
दरम्यान, आज करोना चाचणीचा अहवाल आला असून त्यांना करोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे छगन भुजबळ यांना करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यानही विषाणूची लागण झाली होती.