नाशिक : मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतल्यानंतर ओबीसी समाजात असंतोषाचे फटाके फुटले. ओबीसी समाज या निर्णयाविरोधात राजकीय पक्षभेद एकवटू लागला आहे. नागपूर येथे काढण्यात आलेला मोर्चा त्यापैकीच एक होता. आता बीड येथे मोर्चाची तयारी केली जात आहे. महायुती सरकारने हा निर्णय घेतल्यापासून राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ मंत्री आणि ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ प्रचंड नाराज आहे. त्यांनी याआधीही या निर्णयाविरोधात असलेली आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे अजित पवार गटातही मतभिन्नता निर्माण झाल्याचे चित्र असताना भुजबळ यांनी अलिकडेच नाशिक येथे पुन्हा एकदा या निर्णयाविषयी मत प्रदर्शन करताना भाजपलाही काही सवाल केले आहेत.
मुंबईत मराठा समाजाने मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने काही निर्णय घेतले. मनोज जरांगे यांच्यापुढे महायुती सरकार झुकले, असा संदेश त्यामुळे इतर समाजांमध्ये गेला. विशेषत्वाने ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर नाराज झाला. महायुती सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फटका ओबीसी समाजाला बसणार असल्याचे ओबीसी नेते म्हणून लागले.
महायुती सरकारने संबंधित निर्णय घेतल्यापासून छगन भुजबळ यांनी वेळोवेळी या निर्णयाविरोधातील भूमिका मांडली आहे. ओबीसी समाज नाराज असताना सत्ताधारी भाजपचे मंत्री राधाकृष्णा विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केल्याने त्यांच्या नाराजीत भरच पडली. याआधी मराठा समाजाचे अनेक राजकारणी नेते झाले. त्यांची मानसिकता सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची होती. एकमेकांना विश्वासात घेतले जात होते. आता मात्र तसे होत नाही. आम्ही आरक्षणासाठी कोणाशी भांडत नाही. ओबीसी आरक्षणातील घुसखोरीविषयी सरकार काही करत नसल्याने आम्ही न्यायालयात गेलो, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली आहे.
राधाकृष्ण विखे आणि मनोज जरांगे यांची भेट कुठल्या कारणासाठी झाली हे माहिती नाही. मराठा आरक्षणाविषयी जो काही आदेश निघाला, तेव्हांपासून १४ ते १५ आत्महत्या झाल्या असतील. या निर्णयामुळे आरक्षण संपले असल्याचा अनेकांचा समज झाला आहे. सध्या हे काय चाललंय, असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला. ओबीसींमध्ये १७४ जाती आहेत. मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण द्यावे, ही आमची मागणी आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. कुठल्याही एका जातीसाठी आम्ही लढत नाही. विधानसभा निवडणुकीवेळी ओबीसी आमचा डीएनए असे सांगितले गेले होते. आता त्यांना कितपत आवश्यकता आहे, माहिती नाही, असा टोला भुजबळ यांनी भाजपला हाणला. खोटी प्रमाणपत्रे घेतली जात आहेत. जाती जातींमध्ये घुसखोरी होत आहे. त्यांना वेगवेगळ्या संघटना विरोध करत आहेत. असे होत असेल तर ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही, असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला.
