नाशिक : करोना काळात छटपूजेसाठी गोदावरी काठावर गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी जमावबंदी लागू केली होती. रस्त्यांवर लोखंडी जाळय़ा बसवून गर्दी रोखण्यासाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले. बुधवारी रामकुंड आणि गांधी तलाव परिसरात शांतता होती. परंतु, इतरत्र गोदा काठावर छट पूजा उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा झाला. त्यासाठी मोठी गर्दी झाली. काठावरील काही भागात शांतता तर काही भागात नियम धाब्यावर बसविले गेल्याचे उघड झाले.

उत्तर भारतीयांचा छटपूजा उत्सव दरवर्षी गोदा घाट, रामकुंड परिसरात उत्साहात साजरा होतो. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षांत करोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने गृह विभागाने नदी, तलावाकाठी एकत्र न येता तो घरीच थांबून साजरा करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक पोलिसांनी उत्तर भारतीयांचे प्रमुख आयोजक व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. गोदावरी नदी, गोदाघाट, रामकुंड येथे छटपूजा साजरी करण्यास मनाई करण्यात आली. गोदा काठावर गर्दी रोखण्यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली. गोदावरी काठाकडे येणाऱ्या मार्गावर लोखंडी जाळय़ा उभारण्यात आल्या. तथापि, हे उपाय गोदा काठावरील गर्दी रोखू शकले नाही.

एरवी, रामकुंड व गांधी तलाव परिसरात छटपूजा उत्सव साजरा होतो. यंदा तिथे कुणाला प्रवेश दिला गेला नाही. इतरत्र म्हणजे गाडगे महाराज पुलापासून पुढील भागात गोदाकाठी चांगलीच गर्दी झाली. महिलांनी गोदापात्रात उतरून पूजा केली. राजकीय मंडळींकडून गर्दी होऊ नये म्हणून कोणत्याही नियमांचे पालन केले जात नसल्याचे कायमच दिसून आले आहे. त्यांचाच आदर्श आता इतर घटकही घेऊ लागले आहेत.