अकरावी प्रवेशप्रक्रिया नियोजनाबाबत शिक्षण विभागाच्या वतीने शनिवारी आयोजित जिल्ह्यातील प्राचार्याच्या बैठकीत छात्रभारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत ठिय्या दिला. यामुळे सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या वेळी शिक्षण अधिकाऱ्यांनी छात्रभारतीच्या मागण्यांचा विचार करत आवश्यक त्या कारवाईचे संकेत दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
येथील रावसाहेब थोरात सभागृहात अकरावी प्रवेशप्रक्रियेबाबत सर्व प्राचार्याची एकत्रित बैठक बोलावण्यात आली होती. साहाय्यक संचालक दिलीप गोंविद आणि के. डी. मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अकरावी प्रवेशप्रक्रिया नियोजित वेळापत्रकानुसार पार पडण्यासाठी आवश्यक सूचना, व्यवस्थापन कोटय़ातील रिक्त जागा, गुणवत्ता यादीनुसार प्रवेशप्रक्रिया यासह अन्य काही महत्त्वपूर्ण मुद्दय़ांवर मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी छात्रभारती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बैठकस्थळी शिरकाव करत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. व्यासपीठासमोर काही कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला. अकरावी प्रवेशप्रकियेतील अनागोंदीकडे आंदोलकांनी लक्ष वेधले. प्रवेशप्रक्रियेत बेकायदेशीररीत्या शुल्क वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई व्हावी तसेच हे बेकायदेशीरपणे घेतलेल्या शुल्काचा विद्यार्थ्यांना परतावा करावा, अशी मागणी करण्यात आली. हा गोंधळ सुरू असताना पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले.
शिक्षण अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत बेकायदेशीररीत्या वसूल केलेले शुल्क परत केले जाईल तसेच तसे न करणाऱ्या महाविद्यालयांच्या अनुदानात कपात करण्यात येईल, शिवाय गरज पडल्यास महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविला जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.