नाशिक – नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात यंदा अतिवृष्टी झाली आहे. सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी याआधीच्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटला. त्यातच बागलाण तालुक्यातून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर- अहवा या महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना जोडणाऱ्या महामार्गावरील पुलाखालील भराव खचल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे. एखादी दुर्घटना होण्याआधीच या पुलावरुन होणारी वाहतूक थांबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर दोन ते तीन दिवसांपासून काहीसा कमी झाला आहे. परंतु, याआधी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील गंगापूर, दारणा, भावली, गिरणा या महत्वाच्या धरणांमधून विसर्ग सुरु आहे. ग्रामीण भागात आणि धरण क्षेत्रात चांगल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. हरणबारी धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे मोसम नदी वाहती झाली आहे. तीच स्थिती गिरणा नदीची आहे. गिरणा धरण ५७ वर्षांमध्ये केवळ १५ व्यांदा भरले. जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे भरली आहेत. मनमाडचा पाणीप्रश्न अ‌लंबून असलेले दिंडोरी तालुक्यातील करंजवण धरणही भरले आहे.

धरणांची अशी स्थिती असताना पेठ, सुरगाणा, कळवण, बागलाण, दिंडोरी यासारख्या ग्रामीण भागात सततच्या पावसामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहत असल्याने काही ठिकाणी गावांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटला आहे. बागलाण तालुक्यात बाभुळणे ग्रामपंचायत हद्दीतील मौजे परशुराम नगर (बाभुळणे) येथे झरणेपाडा पूल आहे.

बागलाण तालुक्यातून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर – आहवा या आंतरराज्य महामार्गावर हा पूल आहे. . हा मार्ग कन्नड, चाळीसगाव, मालेगाव, ताडगाव आणि सापुतारामार्गे गुजरातच्या डांग जिल्हयातील मुख्यालय असलेल्या अहवापर्यंत जातो. झरणेपाडा पुलाखालील मातीचा भराव पूर्णपणे खचला असून पुलाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक सुरू राहिल्यास कधीही मोठी दुर्घटना किंवा जीवितहानी होण्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

मुसळधार पावसामुळे पुलाच्या पायाजवळील माती वाहून गेल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे. हा महामार्ग अत्यंत वर्दळीचा असून दररोज मोठ्या प्रमाणात जड वाहने तसेच प्रवासी वाहने या मार्गावरून ये-जा करतात. त्यामुळे तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन वाहतुकीबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. स्थानिक नागरिकांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच प्रशासनाने घटनास्थळी त्वरित पाहणी करून पुलाची सुरक्षितता तपासावी आणि तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करावे, अशी मागणी केली आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास मोठा अनर्थ होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगर -आहवा आंतरराज्य महामार्गावरील पुलाखालील मातीचा भराव खचल्याने मोठे भगदाड पडले आहे पावसाचा जोर कायम राहिल्यास पुलाला धोका निर्माण होऊन मोठी दुर्घटना होऊ शकते. यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. – नंदलाल ठाकरे (सरचिटणीस, जोगेश्वरी ग्रामविकास शिक्षण संस्था, ताहाराबाद, ता. बागलाण, नाशिक