नाशिक : लोकसभेत महायुतीकडून काही चुका झाल्या. उमेदवार जाहीर करण्यात उशीर झाला, अशी कबुली देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पराभवाचा वचपा काढण्याची संधी विधान परिषद निवडणुकीत आली असल्याचे सांगितले.नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ शनिवारी मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्ह्यातील संस्थाचालकांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये कांद्याचा विषय होता, आपलेही काही लोक उभे राहिले, असे दाखले देत नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात विलंब झाल्याचे मान्य केले.

राज्यात शिवसेनेच्या सात जागा आल्या. ठाकरे गटाची जागा जिंकण्याची सरासरी कमी असून शिंदे गटाची जास्त आहे. आमचे सरकार देणारे आहे. आधीचे सरकार घेणारे सरकार होते, असा टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना हाणला. पराभव होऊनही विरोधक आनंद व्यक्त करताहेत. जुन्या निवृत्तिवेतनाचा निर्णय आम्ही घेतला. प्रचलित अनुदान, आदिवासी आश्रमशाळांची वेळ अशा विविध मागण्यांवर आचारसंहिता संपताच विचार केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

हेही वाचा >>>निवडणुकीत महायुतीकडून काही चुका;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कबुली

तेढ निर्माण होऊ नये म्हणून प्रयत्नशील

राज्यात मराठा-ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घेतल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी धन्यवाद दिले. यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकमध्ये शिंदे गटाला अजित पवार गटाच्या उमेदवाराशी लढावे लागत असल्याबद्दल विचारले असता आमचे उमेदवार किशोर दराडे कामाच्या जिवावर निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.

(मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी नाशिक येथे शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ मेळावा घेतला.)