नाशिक : करोना काळात आणि त्याआधीच्या वर्षांत नियंत्रणात राहिलेल्या चिकनगुनियाचा आलेख या वर्षांत कमालीचा उंचावला आहे. मागील पाच वर्षांत कधीही आढळले नव्हते इतके म्हणजे तब्बल ८८२ रुग्ण १० महिन्यांत विभागात आढळले आहेत. यातील सर्वाधिक ६३४ रुग्ण हे एकटय़ा नाशिक महापालिका हद्दीतील आहेत. दुसरीकडे विभागात डेंग्यूचे १० महिन्यात १४७९ रुग्ण आढळले आहेत. आरोग्य सेवा नाशिक मंडळ कार्यालयाच्या अहवालावरून ही माहिती समोर आली आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असताना चिकनगुनिया आणि डेंग्यूने डोके वर काढल्याचे चित्र आहे. २०१८ वर्षांचा अपवाद वगळता २०१६ ते २०२० या कालावधीत चिकनगुनियाच्या रुग्णांनी तीन आकडी संख्या गाठली नव्हती. जानेवारी ते १० ऑक्टोबर २०२१ या कालावधीत मात्र बाधितांची आकडेवारी थेट ८८२ वर गेली आहे. या काळात ३८४७ जणांचे नमुने तपासले गेले. त्यात नाशिक महापालिका क्षेत्रात २२९५ नमुन्यांपैकी ६३४ तर नाशिक ग्रामीणमध्ये १४९४ पैकी २२० जणांचे नमुने सकारात्मक आले. मालेगावमध्ये तीन, जळगाव ग्रामीण तीन, नगर (ग्रामीण) २०,  नगर  (मनपा) दोन रुग्ण आढळले. धुळे ग्रामीण व शहर तसेच नंदुरबार जिल्ह्यात या आजाराचा एकही रुग्ण आढळला नाही.

नाशिक शहर आणि ग्रामीण भागात ऑक्टोबरमध्येही चिकनगुनियाचे रुग्ण आढळत आहेत. या काळात १८१ नमुन्यांची तपासणी होऊन ३० रुग्ण आढळले. त्यातील सात ग्रामीण तर, उर्वरित २३ शहरातील आहेत. या आजाराने कुणाचा मृत्यू झालेला नाही.

वर्षनिहाय स्थिती

२०१६ वर्षांत विभागात चिकनगुनियाचे ५५ रुग्ण आढळले होते. त्यापुढील वर्षांत ही संख्या ५८ वर गेली. २०१८ मध्ये १८० जणांना चिकनगुनिया झाला होता. २०१९ मध्ये ही संख्या कमी होऊन १५ वर आली. २०२० मध्ये विभागात या आजाराचे ८४ रुग्ण आढळले. २०२१ वर्षांतील १० महिन्यात रुग्णांची संख्या ८८२ वर गेली आहे.

डेंग्यूचाही ‘ताप’ चिकनगुनिया पाठोपाठ विभागात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. यंदाच्या वर्षांत एकूण ८९७० संशयितांचे नमुने तपासले गेले. त्यात १४७९ रुग्ण आढळले. यात सर्वाधिक ८९० रुग्ण नाशिक महापालिका क्षेत्रातील असून ग्रामीण भागातील २११ रुग्ण आहेत. मालेगावमध्ये तीन, धुळे ग्रामीण ४९, धुळे शहर ७२, नंदुरबार जिल्ह्यात १०१, जळगाव ग्रामीण २४, जळगाव शहर१०, अहमदनगर ग्रामीण ७२, अहमदनगर महापालिका हद्दीत ४७ रुग्णांचा समावेश आहे. नाशिक शहर व ग्रामीण भागात ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडय़ात डेंग्यूचे रुग्ण सापडत असल्याने चिंता वाढली आहे. या आजाराने एका रुग्णाचा मृत्यू झाला. मागील वर्षीच्या (६१४) तुलनेत यंदा रुग्णांची संख्या जवळपास अडीच पट वाढली आहे. २०१६ मध्ये विभागात डेंग्यूचे १९२१, २०१७ मध्ये १३९१, २०१८ वर्षांत १६५०, २०१९ मध्ये २४९९ असे डेंग्यूचे रुग्ण आढळले होते.