scorecardresearch

जळगाव : नशिराबादमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षक भिंतीखाली दबून मुलाचा मृत्यू

नशिराबाद येथील सुनसगाव रस्त्यावरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची संरक्षक भिंत कोसळून तेरा वर्षीय मुलाचा दबून मृत्यू झाला.

Child death Nashirabad
नशिराबादमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षक भिंतीखाली दबून मुलाचा मृत्यू (प्रातिनिधिक छायाचित्र)

जळगाव – नशिराबाद येथील सुनसगाव रस्त्यावरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची संरक्षक भिंत कोसळून तेरा वर्षीय मुलाचा दबून मृत्यू झाला. यासंदर्भात संबंधित शाळा प्रशासन आणि बांधकाम करणार्‍या ठेकदाराविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी मृत मुलाच्या नातेवाइकांकडून करण्यात आली. यासंदर्भात पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मोहित योगेश नारखेडे (वय १३, रा. नशिराबाद, ता. जळगाव) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

नशिराबाद येथील सुनसगाव रस्त्यावरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर मोहित नारखेडे हा आई-वडील व मोठा भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होता. मोहित हा गावातील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सातवीत शिकत होता. तो भादली येथे रामनवमीच्या शोभायात्रेत थरारक प्रात्यक्षिक करून दाखविण्यासाठी सहभागी होता. रात्री उशिरा आल्यानंतर तो सकाळी शाळेत गेला नव्हता. सकाळी अकराच्या सुमारास शाळेजवळ खेळत असताना संरक्षक भिंत कोसळली. तो त्याखाली दबून गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. दुपारी दोनच्या सुमारास त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासत मृत घोषित केले.

हेही वाचा – संयोगीताराजे व्हायरल पोस्ट : “सनातन धर्म पुन्हा डोकं वर काढतोय..” जितेंद्र आव्हाडांनी दिली ‘या’ आंदोलनाची हाक

हेही वाचा – नाशिक: अवैध देशी दारु अड्ड्यावर छापा, ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

मुलाचा मृत्यू झाल्याने आई-वडिलांनी आक्रोश केला. मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संबंधित शाळा प्रशासन व ठेकेदाराविरुद्ध जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मृत मोहितचे वडील योगेश अशोक नारखेडे यांनी व नातेवाइकांनी घेतला होता. पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक किशोर पवार व कर्मचारी उपस्थित होते. मृत मोहितच्या मागे आई-वडील, मोठा भाऊ, असा परिवार आहे. वडील नशिराबाद येथील ओरिएंटच्या सिमेंट फॅक्टरीत ट्रॅक्टरचालक म्हणून नोकरीला आहेत. याप्रकरणी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Nashik News (नाशिक / उत्तर महाराष्ट्र न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 11:23 IST

संबंधित बातम्या