Childbirth of a minor girl divorced through the mediation of a caste panchayat in nashik | Loksatta

नाशिक; जात पंचायतीच्या मध्यस्थीने घटस्फोट झालेल्या अल्पवयीन मुलीची प्रसुती; मुलीच्या वडिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात

बाळाच्या जन्म दाखल्यावर वडील म्हणून कोणाचे नाव लावायचे, यावरून गोंधळ उडाला. या प्रकरणात मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या वडिलांविरुध्द घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक; जात पंचायतीच्या मध्यस्थीने घटस्फोट झालेल्या अल्पवयीन मुलीची प्रसुती; मुलीच्या वडिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात
जात पंचायतीच्या मध्यस्थीने घटस्फोट झालेल्या अल्पवयीन मुलीची प्रसुती

नाशिकमधील इगतपुरी तालुक्यात एका घटस्फोटीत अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी या अल्पवयीन मुलीचा बालविवाह होऊ दिला नव्हता. मात्र, तरीही काही दिवसांनी तिचा विवाह करुन तिला सासरी पाठवण्यात आले होते. सासरी असताना तिला दिवस गेले होते. परंतु सततच्या भांडणामुळे ती पुन्हा माहेरी आली होती. या सर्व प्रकारानंतर या घटनेनंतर पोलिसांनी मुलीच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा- नाशिक: भटक्या, पाळीव श्वानांवरून वादंग; मायलेकीला जीवे मारण्याची धमकी, विनयभंग

इगतपुरी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा विवाह सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांच्या पुढाकाराने काही दिवसांपूर्वी रोखला गेला होता. त्यावेळी बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी अल्पवयीन मुलीच्या कुटूंबीयांकडून हा विवाह स्थगित केल्याचे लेखी घेतले होते. मधल्या काळात मुलीचा विवाह वाडीवऱ्हे येथील एका मंदिरात झाला. मुलगी सासरी गेली. ती गर्भवती राहिल्यानंतर पती-पत्नीत वाद झाले. प्रकरण ठाकूर समाजातील जात पंचायतीपर्यंत गेले. पंचायतीने दोघांचा काडीमोड करून दिला. दुसरे लग्न केल्यास पहिल्या पतीला ५१ हजार रुपये देणार, असे मुद्रांकावर मुलीकडून लिहून घेण्यात आले.

हेही वाचा- VIDEO: “अनेक मुलींचे खून हिंदू मुलांकडूनही झालेत आणि…”, ‘लव्ह जिहाद’वर बोलताना संजय राऊतांचं मोठं विधान

काही दिवसांपूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयात अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतर बालविवाहाचे हे सर्व प्रकरण उघड झाले. बाळाच्या जन्म दाखल्यावर वडील म्हणून कोणाचे नाव लावायचे, यावरून गोंधळ उडाला. या प्रकरणात मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या वडिलांविरुध्द घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मुलीच्या वडिलांना ताब्यात घेतले आहे. याविषयी हनुमंत सराई या ग्रामस्थाने मुलीच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा- पुणे – नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत; महारेल रेल्वेमंत्र्यांकडे भूमिका स्पष्ट करणार

या प्रकरणाला अनेक कंगोरे असले तरी जात पंचायतीने घटस्फोट घडवून आणल्याचे दिसून येत आहे. अशी जात पंचायत बसवून न्याय निवाडे करणे कायद्याच्या विरोधात आहे. ठाकूर जात पंचायतीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जात पंचायत मूठमाती अभियानाचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांनी केली आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 22:53 IST
Next Story
नाशिक: भटक्या, पाळीव श्वानांवरून वादंग; मायलेकीला जीवे मारण्याची धमकी, विनयभंग