नाशिक :  देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जात असताना जिल्ह्यातील काही भाग ७५ वर्षांनंतरही सोयीसुविधांपासून वंचित असल्याचे वास्तव आहे. दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागातील जोरण येथील शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी नदीतील पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागणे, ही एक त्यापैकीच कहाणी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जोरण या गावात बहुतांशी लोकवस्ती शेतकरी कुटुंबांची आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात शेत शिवारातच वस्ती असल्याचे दिसते. मळय़ांमध्ये वस्ती करून राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पावसाळय़ात शाळेत जाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी नदी पार करणे भाग आहे. हिवाळा तसेच उन्हाळय़ात नदीला पाणी कमी राहत असल्याने विद्यार्थ्यांना नदी पार करणे कठीण जात नाही, परंतु पावसाळय़ात दुथडी भरून वाहणारी नदी पार करणे विद्यार्थ्यांसाठी एक दिव्यच आहे. गावातून जाणाऱ्या या नदीवर पूल नसल्याने पुराच्या पाण्यातून एकमेकांच्या साह्याने दररोज नदी ओलांडावी लागते. या गावातून बहुतांश विद्यार्थी परिसरातील इतर मोठय़ा गावांमध्ये शिक्षणासाठी दररोज ये-जा करत असतात. दररोज अशी कसरत करावी लागते. जोरण ते जुना नळवाडी रस्त्यावर ही नदी असून याच नदीपात्रात जोरण येथील लघु बंधारादेखील आहे. साधारणपणे ४० ते ५० विद्यार्थ्यांना नदीपात्र पार करण्याची कसरत दररोज करावी लागत आहे.

या पावसाळय़ात मागील महिन्यापासून तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू आहे .त्यामुळे परिसरातील सर्व नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. असे असतानाही पाल्याच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी पालक दररोज आपल्या पाल्याला कडेवर किंवा खांद्यावर घेऊन नदी पार करतात. अनेक दिवसांपासून या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे नदीपात्र पार करावे लागत आहे.

अनेकदा पालक आणि नागरिकांनी शासनाकडे आपली कैफियत मांडली आहे, परंतु या नदीपात्रावर शासनाने पूल उभारलेला नाही. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. एकीकडे शिक्षणाच्या मूलभूत अधिकारांतर्गत ग्रामीण भागातील सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालावा लागत आहे .त्यामुळे शासनाने तातडीने या नदीवर पूल बांधून येथील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी जोरण येथील विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे.

जोरण येथील ४०ते ५० विद्यार्थी रोज शाळेसाठी इतरत्र जात असतात. पावसाळय़ात या विद्यार्थ्यांना जोरण ते जुना नळवाडी रस्त्यावरील नदी ओलांडून जावे लागते. पाऊस सुरू असताना नदीच्या पाणी पातळीत वाढ होते. अशावेळी जीव धोक्यात घालून शालेय विद्यार्थ्यांना पात्र ओलांडावे लागते. या ठिकाणी पूल बांधून मिळावा यासाठी आतापर्यंत अनेक वेळा शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे, परंतु अजून ते झाले नाही. त्यामुळे जीवघेणी कसरत सुरूच आहे.

– अरुण कड ( शिवसेना उपतालुका समन्वयक, दिंडोरी)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Children cross flooded river for going school in dindori taluk zws
First published on: 18-08-2022 at 00:56 IST