सिन्नर: सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सुरू असलेले ५७ दिवसांचे ऐतिहासिक उपोषण अखेर ५८ व्या दिवशी मागे घेण्यात आले आहे. मुंबईत मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. येत्या दहा दिवसांत यावर अंतिम तोडगा काढण्यासाठी पुन्हा बैठक घेण्याचे निश्चित झाले आहे.
सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील शेतकऱ्यांनी जमीन हस्तांतरणासह विविध मुद्द्यांवर उपोषण सुरू केले होते. प्रामुख्याने कुंभमेळा वळण रस्ता (राज्यमार्ग ३७) मुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. रस्ता रुंदीकरण करायचे असल्यास शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा किंवा सध्याच्या रस्त्याइतकेच काम करून डिनोटिफिकेशन रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली होती. जोपर्यंत मोबदला मिळत नाही, तोपर्यंत काम सुरू करू नये यावर शेतकरी ठाम होते.
मंत्रालयात सकारात्मक चर्चा
याप्रश्नी मंत्री बावनकुळे यांनी आश्वासन दिले की, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल. गरज पडल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा करून मार्ग काढण्याचे ठरले. या बैठकीला अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, आ. माणिकराव कोकाटे, भाजप नेते उदय सांगळे आणि सचिव म्हैसकर उपस्थित होते.
गिरीश महाजनांची मध्यस्थी फळाला
भाजप नेते उदय सांगळे यांनी या प्रश्नासाठी ‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. महाजन यांनी मुख्यमंत्री आणि मंत्री बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळेच मंत्रालयात ही महत्त्वाची बैठक पार पडली आणि ५७ दिवसांपासून सुरू असलेला कोंडीचा प्रश्न सुटला.
लिंबू सरबत देऊन उपोषण सोडले
सरकारच्या सकारात्मक भूमिकेनंतर तहसीलदार देशमुख यांनी गुरुवारी प्रत्यक्ष उपोषणस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. यावेळी भाजप नेते उदय सांगळे उपस्थित होते. शेतकऱ्यांना लिंबू सरबत देऊन या ५८ दिवसांच्या संघर्षाची तात्पुरती स्थगिती करण्यात आली.
या बैठकीत शेतकरी प्रतिनिधी म्हणून भास्कर उगले, भाऊराव झाडे, कचरू गंधास, भाऊसाहेब हरळे, दौलत झाडे, मुरली नागरे, ज्ञानेश्वर सानप, दत्तू नागरे, विठ्ठल सांगळे, पांडुरंग झाडे, सुदाम मुठाळ, रामदास झाडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

