चित्रा वाघ यांची टीका

नवजात बालकांच्या मृत्यूमुळे चर्चेत आलेल्या नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात राजकीय मंडळींची रीघ मंगळवारीदेखील कायम राहिली. मंगळवारी दुपापर्यंत सत्ताधारी भाजपचा एकही स्थानिक आमदार वा पालकमंत्री रुग्णालयाकडे फिरकले नाहीत. हा धागा पकडत राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये इतकी गंभीर घटना घडूनही भाजपच्या मंडळींनी दखल न घेतल्यावरून संबंधितांमध्ये संवेदनशीलता राहिली नसल्याची टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे.

Himachal Pradesh Speaker disqualifies 6 Congress MLAs
हिमाचलमध्ये राजकीय उलथापालथ चालूच! काँग्रेसचे ‘ते’ सहा आमदार अपात्र, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; कारण काय?
bjp candidates first list for upcoming lok sabha elections likely to be announced in next two three days
भाजपची पहिली यादी तीन दिवसांत? केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत बैठक
narendra modi and sharad pawar
काँग्रेसच्या काळात एका रुपयाचे  १५ पैसे व्हायचे, आता मी एक बटण दाबले आणि…; पंतप्रधान माेदींकडून शरद पवार यांचे नाव न घेता टीका
cross voting in Rajya Sabha elections
राज्यसभेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगच्या चर्चेला उधाण? आता निकालाकडे सर्वांचे लक्ष!

जिल्हा शासकीय रुग्णालयातील विशेष नवजात बालक कक्षात मागील पाच महिन्यांत १८७ बालकांचा मृत्यू झाल्याचे उघड झाल्यानंतर आरोग्य विभागाला जाग आली. तोपर्यंत रुग्णालयातील प्रलंबित अनेक प्रश्नांचा सर्वाना विसर पडला होता. या विषयाची माहिती मिळाल्यावर राष्ट्रवादीचे आ. जयंत जाधव यांनी प्रथम रुग्णालयास भेट देऊन सद्य:स्थिती जाणून घेतली. रुग्णालयाच्या बिकट अवस्थेची माहिती आरोग्यमंत्र्यांना देऊन मुंबईत तातडीने बैठकीचे आयोजन केले. मुंबईत बैठक पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरोग्यमंत्री दीपक सावंत हेदेखील अकस्मात रुग्णालयात दाखल झाले. धावत्या भेटीत त्यांनी तातडीचे व दीर्घकालीन करावयाच्या उपायांची माहिती दिली. अतिशय संवेदनशील व गंभीर विषयाचे राजकारण करावयाचे नसल्याचे सांगत विरोधी पक्षांची पावले रुग्णालयाकडे पडली. राष्ट्रवादीने हा विषय लावून धरल्याने काँग्रेसही मैदानात उतरली. माजी आरोग्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद आहेर, महिला अध्यक्षा वत्सला खैरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने रुग्णालयाची पाहणी केली. बालरुग्णांना वाचविण्यासाठी आवश्यक ती औषधे व इनक्युबेटरची तातडीने व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. विभागीय संदर्भ रुग्णालयातील बंद उपकरणांवर काँग्रेसने बोट ठेवले. आपच्या प्रवक्त्या प्रीती मेनन यांनी रुग्णालयास भेट देऊन बालमृत्यूवरून रुग्णालय प्रशासन व सत्ताधाऱ्यांविरोधात तोफ डागली.

नवजात बालकांच्या मृत्यूवरून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी मंगळवारी जिल्हा रुग्णालयातील स्थितीचे अवलोकन करत विभागीय आयुक्त, महापौर यांच्याशी चर्चा केली. १८७ बालकांचे बळी गेल्यानंतर सरकारला जाग आली. इनक्युबेटरची आधीच उपलब्धता झाली असती तर इतके बळी गेले नसते. बालमृत्यूचे मूळ कुपोषणात आहे. कुपोषण निर्मूलनासाठी सरकारची कोणतीही योजना नाही. सीएसआर निधीवर शासन कुपोषणमुक्तीच्या निव्वळ घोषणा करते, असे टीकास्त्र वाघ यांनी सोडले. माता व बाल संगोपन कक्षाचे काम वृक्षतोडीला परवानगी न मिळाल्याने रखडले. नाशिक महापालिकेत भाजपला एकहाती सत्ता मिळाली. वृक्ष प्राधिकरण समितीने वृक्षतोडीबाबत निर्णय घेतला असता तर कक्षाचे काम मार्गी लागले असते. तीन वर्षांत भाजप निव्वळ घोषणाबाजी करत आहे. बालमृत्यूचे प्रकरण घडले नसते तर वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्यांची नेमणूक केली गेली नसती. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये हा गंभीर प्रकार घडला आहे. तरीदेखील पालकमंत्री वा स्थानिक आमदारांनी दखल घेतली नसल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. काही वर्षांपूर्वी आरोग्य विद्यापीठ आणि महापालिका यांच्यात पालिका रुग्णालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यायोगे आरोग्य सुविधा वृद्धिंगत करणे शक्य होते. मात्र त्याबद्दल महापौर अनभिज्ञ असल्याचे वाघ यांनी नमूद केले.

भाजपचा भ्रमणध्वनीवरून आढावा

जिल्हा रुग्णालयात बालमृत्यूचा प्रकार समोर आल्यानंतर आरोग्यमंत्री वगळता सत्ताधारी सेना वा भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधींनी रुग्णालयास भेट देऊन स्थितीचा आढावा घेतलेला नाही. या संदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता पालकमंत्री गिरीश महाजन आणि आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी भ्रमणध्वनीवरून माहिती घेतल्याचे सांगण्यात आले. आ. फरांदे यांच्या विधानसभा मतदारसंघात हे रुग्णालय आहे. जिल्हा व संदर्भ सेवा रुग्णालयातील रखडलेल्या प्रश्नांबाबत त्यांनी आरोग्यमंत्र्यांकडे अनेकदा पाठपुरावा केला होता. महिनाभरापासून त्या नाशिकमध्ये नसल्याने त्यांना रुग्णालयास भेट देता आली नसल्याचे सांगण्यात आले. रुग्णालयाशी निगडित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोग्यमंत्र्यांनी अकस्मात भेट देताना स्थानिक भाजप आमदारांना कल्पना दिली नसल्याचे अन्य महिला आमदाराचे म्हणणे आहे. नाशिकचे खा. हेमंत गोडसे यांनी रुग्णालयात प्रत्यक्ष भेट न देता भ्रमणध्वनीवरून माहिती घेतल्याचे सांगितले जाते.