२०३० पर्यंत प्रदूषण धोकादायक पातळीवर जाण्याची शक्यता

नाशिक : राष्ट्रीय मानकांनुसार शहरात कमीत कमी २१ हवा तपासणी केंद्रांची (एयर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन) आवश्यकता असताना प्रत्यक्षात केवळ  एकच केंद्र आहे. उद्योग आणि वीजनिर्मिती क्षेत्राचा नाशिकच्या एकूण वायू प्रदूषणात ६८ टक्के वाटा असून वेळीच लक्ष न दिल्यास २०३० पर्यंत वायू प्रदूषणाची पातळी अत्यंत धोकादायक पद्धतीने वाढत राहण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय सेवा दल, मानव उत्थान मंच आणि वातावरण फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित ऑनलाइन बैठकीत नाशिक शहरातील हवेच्या प्रदूषणावर चर्चा करण्यात आली. बैठकीस शहरातील पर्यावरणवादी, अभ्यासक, संस्था, संघटनांचे  प्रतिनिधीत्व करणारे ६० पेक्षा अधिक लोक उपस्थित होते.

हवेच्या गुणवत्तेवर स्वतंत्रपणे संशोधन करणाऱ्या अर्बन एमिशन्सचे संस्थापक सरथ गुट्टीकुंडा यांनी यावेळी मार्गदर्शन केले. वायू प्रदूषणाचा सर्वात मोठा स्त्रोत ६८ टक्के वाट्यासह उद्योग क्षेत्र (वीजनिर्मिती प्रकल्पांसह) आहे. त्यानंतर धूळ आणि वाहतूक क्षेत्राचा क्रमांक आहे. या स्त्रोतांकडे वेळीच लक्ष न दिल्यास २०३० पर्यंत प्रदूषण धोकादायक पातळीवर जाण्याचा इशाराही गुट्टीकुंडा यांनी दिला. शहरात अधिक हवा तपासणी केंद्रे उभारल्यास दैनंदिन श्वास घेत असलेल्या हवेची गुणवत्ता जाणून घेण्यास मदत नागरिकांना मदत होईल. भविष्याची आखणी करायलाही त्यामुळे मदत होईल. स्थानिक पातळीवर माहिती गोळा करणे आणि त्यासोबतच लवकरात लवकर हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रदूषण नियंत्रण धोरणाची आखणी करणे गरजेचे असल्याकडे गुट्टीकुंडा यांनी लक्ष वेधले.  मानव उत्थान मंचचे जगबीर सिंग यांनी २०१८ मध्ये नाशिक राज्यातले सहावे सर्वाधिक प्रदूषित शहर असल्याचे जाहीर झाले, तेव्हांच धोक्याची घंटा वाजल्याचे सांगितले. नागरी संस्थांचे अनेक कार्यकर्ते नाशिकच्या हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कार्यरत असले तरी सामान्य नागरिक नाशिकच्या स्वच्छ हवा कार्यक्रमाबाबत जागरुक नाहीत. केंद्र सरकारने शहरात स्वच्छ हवेचे ध्येय गाठण्यासाठी मंजूर के लेले २० कोटी रुपये कोठे आणि कसे खर्च होत आहेत, हे समजत नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी नाशिकच्या स्वच्छ हवा कृती कार्यक्रमाची संपूर्ण माहिती आणि खर्चाची तरतूद याबाबत नागरिकांना माहिती द्यावी, असे सिंग यांनी नमूद के ले. राष्ट्रीय सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन मते यांनी नाशिक स्वच्छ हवा गट उभा करून सर्व हितसंबंधीयांना एकत्र आणण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. ए.सी.पी.एम. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा. डॉ. गौरी कुलकर्णी यांनी बैठकीत वायू प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम मांडले.

वातावरण फाउंडेशनचे संस्थापक भगवान केसभट यांनी नाशिकचे नागरिक वायू प्रदूषणाबाबत जागृती करण्यासाठी एकत्र येत असल्याबद्दल समाधान व्यक्त के ले. सूत्रसंचालन नितीन मते यांनी केले. पर्यावरण क्षेत्रात काम करणारे ‘झटका‘चे रोशन केदार, चंद्रकिशोर पाटील, भारती जाधव, छात्र भारतीचे उपाध्यक्ष समाधान बागूल, गुरुवर्य दादासाहेब बुवा शिक्षण संस्थेचे सचिव अमित खरे आदी बैठकीत सहभागी झाले होते.