सर्व २३० बस रस्त्यांवर; नव्याने ५० गाडय़ांची पूर्तता होणे अवघड
नाशिक: मनपाच्या सिटीलिंक बस सेवेंतर्गत सर्वच्या सर्व म्हणजे २३० बस रस्त्यांवर धावत असून उर्वरित २० बस राखीव स्वरूपात ठेवण्यात आल्या आहेत. उपलब्ध सर्व गाडय़ांचा पूर्ण क्षमतेने वापर होत असल्याने महानगर परिवहन महामंडळास नव्याने एखाद्या मार्गावर सेवा देणे किंवा अस्तित्वातील मार्गावर बसची संख्या वाढविण्यास मर्यादा आली आहे. अनेक भागात सेवा सुरू करण्याची मागणी होत असली तरी गाडय़ा नसल्याने वर्षभरात त्यांची पूर्तता करणे अवघड झाले आहे.
शहरवासीयांच्या सोयीसाठी महापालिकेने ८ जुलै २०२१ रोजी शहर बस सेवेची सुरुवात केली होती. शहरात एकूण ६३ मार्गावर सेवा देण्याचे नियोजन होते. पाच टप्प्यात ही सेवा १५ जून २०२२ पर्यंत सुरू करण्याचे नियोजन होते. परंतु, महिनाभर आधीच हे लक्ष्य गाठण्यात आले आहे. नियोजित टप्प्यानुसार आणि शहरालगतच्या २० किलोमीटरच्या क्षेत्रात शक्य त्या मार्गावर सिटीलिंकची सेवा कार्यान्वित झाली आहे. शहर बस सेवेसाठी झालेल्या करारानुसार दोन कंपन्यांकडून एकूण २५० सीएनजी आणि डिझेल बसगाडय़ांची उपलब्धता झाली. त्यातील २३० बसचा सध्या वापर होत आहे. त्यांच्यामार्फत दैनंदिन सरासरी दोन हजार ४६ फेऱ्या मारल्या जातात. यातून प्रतिदिन सरासरी १६ लाख १६ हजार १५२ रुपयांचे उत्पन्न मिळते. सिटीलिंकच्या बस दररोज ४० हजार ६१८ किलोमीटर अंतराचा प्रवास करीत आहेत.
उपलब्ध झालेल्या बसपैकी २० गाडय़ा राखीव म्हणून ठेवण्यात आल्या. त्यातील १० बस कुठेही गरज भासल्यास, देखभाल दुरुस्तीकामी पर्यायी व्यवस्था म्हणून आहेत. तर १० बस विशेष मागणी झाल्यास म्हणून राखीव ठेवल्या गेल्या आहेत. याचा विचार करता महानगर परिवहन महामंडळाकडील सर्व बसगाडय़ांचा वापर होत असल्याची स्थिती आहे. प्रवाशांचा विचार करता बसगाडय़ा कमी पडायला लागल्या आहेत. १५ जूननंतर शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यानंतर किती शालेय विद्यार्थी येतील, यावर किती बसची गरज भासेल, याचा अंदाज बांधता येईल. दुसरीकडे सिटीलिंकची सेवा सुरू करण्यासाठी २५-३० बसची मागणी आहे. परंतु, ही देखील पूर्ण करता येणार नसल्याचे अधिकारी सांगतात. प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेऊन आणखी ५० बसची गरज आहे. पण, करारात बसची संख्या वाढविण्याची कुठलीही तरतूद नव्हती. त्यामुळे त्या मिळण्याची शक्यता नाही. नवीन करारनामा करायचा ठरवले तरी त्यात संपूर्ण वर्ष जाते. त्यामुळे पुढील वर्षभरात कुठल्याही भागात नवीन बस उपलब्ध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
नाशिक-कसारा सेवा कठीण
मनपाच्या सिटी लिंक बस सेवेला प्रवासी वाहतुकीसाठी मनपाच्या २० किलोमीटरच्या परिघात सेवा देण्यास परवाना मिळालेला आहे. नाशिक-कसारा हे अंतर ६० किलोमीटरहून अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांचा मोठा राबता असणाऱ्या आणि उत्पन्न मिळवून देऊ शकणाऱ्या या मार्गावर कितीही इच्छा असली तरी सिटीलिंकला सेवा देणे अशक्यप्राय आहे. खुद्द नाशिक महानगर परिवहन महामंडळाने तसा कुठलाही विचार केलेला नाही. नाशिक-कसारा मार्गावर सेवा देण्याचा विचार सुरू असल्याचे मध्यंतरी पालिका आयुक्त रमेश पवार यांनी म्हटले होते. तथापि, सिटीलिंकला मिळालेला परवाना पाहता नाशिकहून कसारापर्यंत सेवा देता येणार नाही.